राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर आणि जिवती तहसिल यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित, जिवती तालुक्याचा इतिहास आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ‘द लॉस्ट पॅराडाईज’ या चित्रपटाचा प्रदर्शन सोहळा
दी. 10 मार्च रोजी सायं 5:00 वाजता तहसिल कार्यालय जिवती येथील प्रांगनावर पार पडला. या कार्यक्रमासाठी संपुर्ण जिवती तालुक्यातून हजारोंचा जनसागर उसळला होता.
‘द लॉस्ट पॅराडाईज’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन जिवती तालुक्याचे तहसिलदार अविनाश शेंबटवाड यांनी केले आहे. यातील सर्व कलाकार हे स्थानिक आदिवासी बांधव आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेला जिवती तालुका कधी सीमावाद तर कधी जमिनीच्या रेकॉर्ड संबंधी वादामुळे नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. अतिशय दुर्गम भागात असलेल्या या तालुक्याला मात्र समृध्द असा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
येथील आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांनी या तालुक्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. याचं संस्कृती आणि इतिहासाचे धागेदोरे शोधणारी, जिवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड लिखित- दिग्दर्शित ही डॉक्यु – ड्रामा चित्रपट आहे.
याअगोदर ‘चुनाव ‘ या त्यांच्या यापूर्वीच्या लघुपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचं टीम ला घेऊन ‘द लॉस्ट पॅराडाईज’ या फिल्म ची निर्मिती केली आहे. ‘चुनाव’ प्रमाणे या फिल्म मध्ये देखील पूर्णपणे स्थानिक लोकांनी अभिनय केला आहे.
तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी नेहमी स्थानिक लोकांना कलाकार म्हणून घेण्यास प्राधान्य दिले आहे. ज्यांना अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नाही अशा सामान्य लोकांना घेऊन बनवलेल्या त्यांच्या फिल्म कदाचित याच कारणांमुळे वेगळ्या ठरतात. ‘ द लॉस्ट पॅराडाईज ‘ ह्या फिल्म चे संपूर्ण चित्रीकरण जिवती तालुक्यात झाले आहे. ह्यासाठी संपूर्ण टीम दिवाळी दरम्यान दहा दिवस जिवती मध्ये वास्तव्यास होती. जिवती मधील वेगवेगळ्या ठिकाणी या फिल्म चे चित्रीकरण झाले आहे. महापांढवणी या गावात काही दिवस ही संपुर्ण टीम वास्तव्यास होती. अतीशय दुर्गम आणि जोखमीच्या ठिकाणी ह्या फिल्म चे चित्रीकरण झाले आहे. त्यापैकी 2-3 किलोमिटर लांब असलेले कपिलाई चे भुयार हे एक अतिशय आव्हानत्मक चित्रीकरण होते असे या चित्रपटाची टीम सांगते.
चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन जिवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी केले आहे, छायांकन अजय घाडगे, सहाय्यक छायाचित्रकार गार्गी भोसले, प्रणय भोयर,धनुष राठोड, प्रोडक्शन मॅनेजर विराज, संगीत तन्मय संचेती, संकलन अथर्व मुळे, ध्वनी अजिंक्य जुमले व कलर कौस्तुभ भोंगे यांनी केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला जिवती वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजुरा मतदार संघाचे आमदार श्री. सुभाष धोटे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचेलवर व आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या समाजसेविका पारोमिता गोस्वामी हे उपस्थित होते.