श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांच्या माध्यमातून शरद पवार भाजप समोर तगड आव्हान निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारांच्या भेटी गाठीला सुरुवात केली आहे.
बीडमध्ये भाजपाने पंकजा मुंडे यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. याच दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यांसह महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणं पूर्ण बदलली आहेत. अशावेळी शरद पवार आपले एक एक पत्ते खेळत नव्याने डाव मांडत आहेत. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे बजरंग सोनवणे यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतीताई मेटे यांच्याशी भेट घेऊन चर्चा करताना मराठा चेहरा भाजपला चितपट करण्यात कितपत यशस्वी होईल का ?याची चाचपणी पवारांनी केली.
याच सोबतच आपल्यापासून दुरावले गेलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचा ओबीसी चेहरा मास्टर स्ट्रोक ठरेल का? याची पडताळणी केली गेली आहे. जयदत्त क्षीरसागर बीडच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील बडं प्रस्थ मानलं जातं. संस्थांचं असलेलं जाळ, राजकारणाचा प्रचंड अनुभव, सोबतच निवडणूक लढण्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ, प्रत्येक मतदाराची जोडली गेलेली नाळ, त्यांच्याशी असलेले जवळीकतेचे नाते. यासारख्या अनेक जमेच्या बाजू जयदत्त क्षीरसागर यांच्या आहेत.
याच्या विरुद्ध परिस्थिती भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांची आहे. त्यांना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा मिळालेला असला तरी गेल्या दहा वर्षात त्यांची जनतेशी असलेली नाळ पूर्ण तुटली गेलेली आहे. स्तुती पाठकांच्या कोंडाळ्यात अडकलेल्या पंकजा मुंडे यांना भेटून काम करायची म्हटलं तर येणाऱ्या अडचणी त्यांच्या माणसांकडून होणारी माणहानी, त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी मतदारांकडे निवडून आल्यानंतर फिरवलेली पाठ यासारख्या अनेक अनुभवांची गाठोडी मतदारांकडे आहे. यामुळे त्यांच्याबद्दल फारसं स्वारस्य मतदारांमध्ये नाही. जयदत्त क्षीरसागर ओबीसी चेहऱ्या सोबतच सर्व समावेशक जाती धर्मांना घेऊन चालणार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या रूपाने बीड जिल्ह्यात हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद कैकपटीने वाढणार आहे. या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांना आपल्या तंबूत पुन्हा परत आणून अनुभवी विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व बीड जिल्ह्याला देण्याची तयारी शरद पवारांनी चालवली आहे.
याच अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांनी काल माजलगाव मतदार संघ पिंजून काढला. आज शिरूर तालुक्याच्या काही भागात त्यांनी दौरा केला. या दौऱ्यामध्ये जवळच्या कार्यकर्त्यांची मतं ते आजमावत आहेत. आखाड्यात उतरण्यापूर्वी तयारीला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील समीकरणं नवं वळण घेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यापुढे तगड आव्हान उभं करण्याचा मास्टर स्ट्रोक शरद पवार खेळत आहेत.