इंडिया आघाडीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- चंद्रपूर – १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रतिभाताई सुरेश धानोरकर यांच्या प्रचारार्थ ओमसाई मंगल कार्यालय राजुरा येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमसकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, निर्मला कुडमेथे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अरूण धोटे, हमीदभाई, आप चे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, उपजिल्हाध्य सुरज ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्याताई चांदेकर, माजी सभापती कुंदाताई जेनेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी उमेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. येथे सर्व जाती, धर्माच्या नागरिकांना सन्मान दिला जातो. आज देशाची लोकशाही वाचविण्यासाठी आपण इंडिया आघाडी स्थापन केली असून सर्व घटक पक्षातील प्रत्येक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यावर आता लोकशाही वाचविण्याची जबाबदारी आहे आणि चंद्रपूर १३ लोकसभा जिंकायची आहे. मला उमेदवारी मिळाल्याने लोकांकडून जो व्यापक प्रतिसाद मिळत आहे ते पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एक विधवा महिला वरचढ ठरत असल्याने आमचे विरोधक आम्हाला अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करून चुकीचे बोलत आहे. मात्र मी रडणारी नाही तर पुर्ण शक्तीने लढणारी महिला आहे. तर आ. सुभाष धोटे म्हणाले की, देश, संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी २०२४ ची लोकसभा निवडणुक महत्त्वाची आहे. यासाठी सर्व प्रकारचे मतभेद विसरून विविध पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली असून सर्वांनी गावागावात, शहरात, बुथ स्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करून श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केले. संचालन कार्याध्यक्ष एजाज अहमद यांनी केले तर आभार प्रदर्शन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महिलांची संख्या उल्लेखनीय होती हे विशेष.