पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातून एक दरोडा पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील मानकापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जाफरनगर मधील गांधी ले-आऊट येथे दरोडेखोरांनी शस्त्रासह घरात प्रवेश करून सुरक्षा रक्षकास जखमी करीत, सोन्याच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लुटला. ही थरारक घटना शनिवारी (ता. ३०) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. रश्मी ईश्वरदयाल पांडे वय 42 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रमाशंकर केदारनाथ दुबे वय 57 वर्ष, रा. गोरेवाडा असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी पांडे घरात एकट्याच राहतात. 12 मार्चपासून रमाशंकर त्यांच्याकडे सुरक्षारक्षक आहेत. ते सायंकाळी 7 वाजता येतात व सकाळी 8 वाजता घरी जातात. शुक्रवारी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास घरासमोरील लोखंडी गेटला कुलूप लावून रश्मी त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या होत्या.
हॉलमध्ये रमाशंकर होते. पहाटे 3 वाजताच्या सुमारास तोंडाला कापड बांधलेले चार सशस्त्र दरोडेखोर हॉलचा दरवाजा तोडून रश्मी यांच्या घरात शिरले. त्यांनी रमाशंकर यांच्यावर शस्त्राने वार केले. रमाशंकर यांनी आरडाओरड केल्याने रश्मी यांना जाग आली. काही वेळाने गुप्ती घेऊन दोन दरोडेखोर रश्मी यांच्या घरात शिरले. आरडाओरड केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पैसे कुठे आहेत अशी विचारणा केली. त्यावेळी एकाने रश्मी यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने, मोबाइल, तीन एटीएम कार्ड व 30 हजार रुपये काढले. त्यानंतर दरोडेखोर सीसीटीव्हीचा डीव्हीआर घेऊन पसार झाले. रश्मी यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली.
एका शेजाऱ्याने मानकापूर पोलिसांना माहिती देताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी जखमी रमाशंकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून दरोडेखोरांचा शोध सुरू केला.