आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. याचे पालन केले जात असून वर्धा येथे निवडणूक विभागाच्या कामावरील वाहनावरच कमळाचे चिन्ह असल्याचे समोर आले आहे. वाहनावर कमळाचे चिन्ह दिसताच शिवसेना ठाकरे गटाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. रामनगर परिसरात हे वाहन कार्यरत होते.
वर्धेत आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज भरण्यासाठी निघणाऱ्या नामांकन रॅलीसाठी व सभेच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून वेगवेगळे पथक बनवून वाहने पाठविण्यात आली होती. यापैकी निवडणूक विभागाच्या एका वाहनावर चक्क कमळाचे स्टिकर असल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिसून आले.
निवडणूक विभागाच्या वाहनावरच चिन्ह असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त होत थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठले. याबाबत तक्रार केली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आशिष पांडे याबाबत तक्रार केली असून आदर्श आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.