पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळमना भागातील विजयनगर भागात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाहाचा प्रकार समोर आला आहे. हा बालविवाह पोलीस व जिल्हा बाल संरक्षण विभागा तर्फे कारवाई करून रोखण्यात आला. ही बाल विवाहाची माहिती परिसरात माहित होताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कळमना भागातील विजयनगर भागात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाहाचा होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने बाल संरक्षण पथक पोलीसांच्या सहकार्याने लग्नाच्या मंडपात दाखल झाले. छत्तीसगड येथील राजनांदगाव येथून मुलाची वरात लग्नमंडपात दाखल झाली होती. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना पथकाने धाड टाकून मुलीच्या आई वडीलांकडे मुलीचे कागदपत्र व वयाचा दाखला मागितला. परंतु घरच्यांनी कुठलाच पुरावा दिला नसल्याने, बाल संरक्षणाचे पथक ती ज्या शाळेत शिक्षण घेत होती, त्या शाळेतून वयाचा दाखला घेतला असता बालिका 15 वर्ष वयाचीच निघाली. त्यामुळे बाल संरक्षण पथक व पोलीसांनी बालिकेच्या आईवडीलांना बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 अन्वये लग्न झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा दम दिल्यानंतर लग्नात उपस्थित मंडळींची भंबेरी उडाली.
पोलीसांकडून मुलांकडच्यांनाही कायद्याची माहिती देताच वर मंडळींनीही परतीचा मार्ग धरला. मुलीच्या आईवडीलांकडून कायद्यान्वये हमीपत्र लिहून घेत, बालिकेला पोलीसांद्वारे काळजी व संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात आले.
ही कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भारती मानकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण अधिकारी साधना ठोंबरे, मिनाक्षी धडाडे, अंगणवाडी सेविका कल्पना नागपूरे आदींकडून करण्यात आली.