प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, शहरातून भव्य मिरवणूक आणि जाहीर सभा.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- चंद्रपूर – १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर यांच्या प्रचारार्थ राजुरा येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिर, राजुरा लगत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, शहरातून भव्य मिरवणूक आणि गांधी चौक राजुरा येथे जाहीर सभा प्रचंड जनसमर्थनासह पार पडली. यावेळी राजुरा येथे प्रतिभाताईंसाठी प्रचंड जनसैलाब उसळल्याचे दिसून आले.
यावेळी अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे होते. यावेळी ते म्हणाले की, भाजपच्या जुमलेबाजीला जनता वैतागली असून वाढती महागाई, बेरोजगारी, सिंचन सुविधा, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रीय सुरक्षा, शेतमालांचे कोसळलेले भाव, प्रकल्पग्रस्त, नुकसानग्रस्तांची होणारी पिळवणूक, महिला सुरक्षा अशा विविध मुद्दय़ांवर मोदी सरकार कुचकामी ठरल्याने जनतेला देशात बदल हवा आहे. आणि आता जनतेने पून्हा काँग्रेसला पर्यायाने इंडिया तथा महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचे निश्चित केले आहे. बहिण – भावाच्या पवित्र नात्यावर असंस्कृत वक्तव्य करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. तर आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी जबरदस्त आणि धडाकेबाज भाषण करून आपण सत्तेवर आल्यास राहुल गांधींच्या पाच गॅरंटी कशा पुर्ण होईल व जनतेला न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. देश, संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांकडून इंडिया आघाडीला व्यापक प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते वायफळ, असंस्कृत बडबड करीत आहेत. जनता यांना नक्कीच धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही याची खात्री आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, अँड. सदानंद लांडे, अँड. अरूण धोटे, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सय्यद सकावत अली, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, आदिवासी नेते श्यामराव पाटील कोटणाके, कामगार नेते शंकर दास, महिला काँ. शहराध्यक्षा संध्या चांदेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरिता कुडे, उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, नितीन पिपरे, तालुकाध्यक्ष संदीप वैरागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष एजाज अहमद यांनी केले तर आभार प्रदर्शन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे शंतनू धोटे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला इंडिया तथा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.