वृद्ध व दिव्यांग मतदारांनी मानले प्रशासनाचे आभार
अनिल कडू, विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणताही मतदार हा आपल्या मतदानाच्या हक्का पासून वंचित राहू नये याकरिता निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणुकीपासून 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले व 40 टाक्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने वर्धा लोकसभा मतदारसंघां अंतर्गत येत असलेल्या हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये 12 व 13 एप्रिल रोजी गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावेळी हिंगणघाट शहरात राहणाऱ्या ग्यारसीबाई पन्नालाल चोपडा या 90 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने आपले पहिले मतदान नोंदविले.
हिंगणघाट मतदार संघामध्ये 206 वृद्ध व दिव्यांग मतदारांनी गृह मतदाची सोय उपलब्ध करून देण्याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार निवडणूक विभागाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फतीने त्यांचेकडून नमुना 12 ड चे फॉर्म भरून घेतले होते.
यावेळी वृद्ध व दिव्यांग या सर्व मतदारांचे घरी जाऊन मतदान करून घेण्याकरिता एकूण 10 पथके तयार करण्यात आली आहेत. दिनांक 12 व 13 एप्रिल या दोन दिवसात सर्व 206 मतदारांचे घरी जाऊन मतदान नोंदविण्यात येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांनी दिली. सदर प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी तहसीलदार कपिल हाटकर, नायब तहसीलदार सागर कांबळे, नायब तहसीलदार काटपातळ व खैरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
घरून मतदान नोंदविलेल्या मतदारांनी निवडणूक विभागाने गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिल्याने मतदानाचा हक्क बजावता आला याबद्दल आभार व समाधान व्यक्त केले.