महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मध्यप्रदेश:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी एक मुलीच्या वडीलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली होती. तीन दिवसानंतर मृतकाच्या मुलीचा विवाह होता पण त्यात एक अजीब गोष्ट घडली.
हिंदू धर्मामध्ये काही पक्ष्यांना फार महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक पक्ष्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं प्रतीक मानलं गेलं आहे. कावळ्यासारख्या पक्ष्याच्या रूपाने तर दिवंगत व्यक्ती पुन्हा येऊन भेटते असं मानलं जातं. त्यामुळे दर वर्षी पितृपक्षात कावळ्यासाठी नैवेद्य ठेवला जातो. मध्य प्रदेशातल्या दामोह जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार घडला आहे. तिथे तीन दिवसांपूर्वी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर या व्यक्तीच्या मुलीचं लग्न होतं. या लग्नात अचानक एक गरुड आला. आश्चर्यची बाब म्हणजे विवाहाच्या सर्व विधींना हा गरुड उपस्थित होता आणि तो लग्नाच्या पंगतीत बसून जेवलाही. या प्रकरणाची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे आणि नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दमोह जिल्ह्याच्या रंजरा गावचे रहिवासी असलेल्या झालम सिंह लोधी यांची मुलगी इमरती हिचा 21 एप्रिल रोजी लग्नसोहळा होता. लग्नसोहळ्याला तीन दिवस शिल्लक असताना 18 एप्रिलला झालम सिंह यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यानंतर गावातल्या लोकांनी एकत्र येऊन झालम सिंह यांच्या मुलीचं मंदिरात लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. सर्व जण लग्नाची तयारी करत असताना अचानक एक गरुड पक्षी उडून घराच्या अंगणात येऊन बसला. या गरुडाला हुसकावून लावण्याचा खूप प्रयत्न केला गेला; पण तो तिथून गेला नाही. त्यानंतर झालम सिंह यांच्या पत्नी आणि इमरतीची आई नौनीबाई यांनी पक्ष्यासाठी दूध ठेवलं. यानंतर पक्षी कुटुंबातल्या सदस्यांमध्ये मिसळून गेला.
एवढंच नाही तर कुटुंबीय लग्नविधीसाठी जेव्हा मंदिराकडे निघाले तेव्हा गरुडही त्यांच्या खांद्यावर बसून मंदिरात गेला. लग्नाच्या प्रत्येक विधीला हा गरुड उपस्थित होता. त्याने लग्नातील पाहुण्यांसोबत पंगतीत बसून भोजनाचा आस्वादही घेतला. नंतर वरमाला विधीच्या वेळी तो स्टेजवर गेला आणि वधूच्या डोक्यावर बसला. झालम सिंह यांच्या कुटुंबातल्या लोकांचं असं म्हणणं आहे, की मृत्यू झालेले झालम सिंह गरुडाच्या रूपात आले आणि त्यांनी आपल्या मुलीला आशीर्वाद दिला. गावकऱ्यांनीदेखील या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती ही घटना फक्त एक योगायोग असल्याचं मानत आहेत.