जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील रामनगर साखर कारखान्या समोर असलेल्या एका हॉटेल मालकाने हॉटेल मधील कामगार राहिलेल्या महिलेचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवार, 11 मे रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. सुभिद्रा वैद्य वय 40 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी आरोपी हॉटेल मालकास मौजपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या सुभिद्रा वैद्य वय 40 वर्ष या मागील 8 वर्षांपासून परिसरातील लंका हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करत होत्या. चार महिन्यांपूर्वी सुभिद्राबाई यांना मुलगा सचिन वैद्य वय 20 वर्ष याने हॉटेलवर कामासाठी जाऊ नको अशी ताकीद दिल्यानंतर महिलेने हॉटेलमध्ये काम करणे बंद केले होते. दरम्यान, हॉटेल मालक गणेश कातकडे वय 45 वर्ष हा कामावर येण्यासाठी महिलेवर दबाव टाकत होता. त्या कामावर जात नव्हत्या. याचा राग मनात धरून आरोपी गणेश कातकडे याने शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास सुभिद्रा वैद्य यांचे घर गाठले. घराची कडी वाजवून दार उघडण्यास भाग पाडले. त्या घराबाहेर येताच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर गणेश कातकडे याने सुभिद्रा वैद्य यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घरात झोपलेला महिलेचा मुलगा सचिन वैद्य हा भांडणाच्या आवाजाने झोपेतून उठून बाहेर आला. गणेश कातकडे याने सचिन वैद्य याच्यावर देखील चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच सचिनच्या मित्राच्या हातावरदेखील वार केले. याप्रकरणी सुभिद्रा वैद्य यांची बहीण शितल ठोके वय 31 वर्ष यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून शनिवारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जखमी सचिन वैद्य यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.