संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ७५ वर्षापेक्षा अधिक काळा पासून सुरू असलेल्या व हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या बल्लारपूर ग्राफीक पेपर प्रॉडक्ट लिमिटेड यूनिट बल्लारपूर येथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षा साधनांचा अभाव दिसून आलेला आहे. कामगारांचे स्वास्थ व सुरक्षा बाबत कंपनी जागृत नसून या ठिकाणी कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा साधनांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून आलेला आहे. प्रत्येक कामगारांना आवश्यक सेफ्टी शूज-रिफ्लेक्टर जॅकेट-एअर प्लग इत्यदी दिला जात नसून त्यांना युनिफॉर्म सुद्धा दिल्या जात नाही. त्यामुळे या कारखान्यामध्ये किरकोळ अपघात होणे नेहमीचीच बाब होऊन बसलेली आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या निदर्शनास सदर गंभीर बाब लक्षात आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी औद्योगिक कामगार स्वास्थ व सुरक्षा विभागाचे संचालक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई यांचेकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.
निवेदनाद्वारे तत्काळ विशेष तज्ञ अधिकारी नियुक्ती करून या कंपनीचे औद्योगिक स्वास्थ व सुरक्षा तसेच कामगारांना देण्यात येणारे सुरक्षा साधन यांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.