संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सेवा कलश फाउंडेशन राजुरा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी च्या परीक्षेत यश संपादित करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मोटिव्हेशनल स्पिकर मनिष तिवारी, सेवा कलश फाउंडेशन राजुराचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सचिव शंतनू धोटे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजुरा, श्री. शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजुरा, अँड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा, स्टेला मॅरीस काँन्व्हेंट बामणवाडा, इन्फंट जिजस काँन्व्हेंट राजुरा इत्यादी शाळा, महाविद्यालयांचा आणि इयत्ता १० वी आणि १२ वी तील ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात आवडीनुसार दर्जेदार शिक्षण घेवून यशस्वी होण्याचे व उत्तम नागरिक होण्याचे आवाहन केले. मोटिव्हेशनल स्पिकर मनिष तिवारी यांनी अपयशाने खचून, यशाने हुरळून न जाता सातत्याने जीवन ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घ्या, आपल्या क्षमतेनुसार आई, वडील, शिक्षक, तज्ञ मार्गदर्शक यांच्याशी योग्य विचार विमर्श करून पुढील शिक्षण व करिअर बाबत निर्णय घ्या आणि एक उत्तम नागरिक, उत्तम समाज, उत्तम राष्ट्र निर्माणासाठी सज्ज व्हा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राध्यापक, शिक्षक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजहर सिद्धिकी, प्रदीप नागोसे, मिथिलेश मुनगंटीवार, विशाल चंदनखेडे, प्रवीण चेंडे यासह अनेकांनी परिश्रम घेतले.