पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- पोलीस विभागातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे. त्यामुळे रक्षकच भक्षक बनल्याच्या चर्चेला उधाण आले. प्रेमप्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली. यावेळी न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीकडेच पोलिसाने शरीर सुखाची मागणी केली. या प्रकरणी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
“सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर येताच नागरिकांची सुरक्षा करणारे पोलीस म्हणून चित्र डोळ्यासमोर येतं. पण हेच रक्षक जर भक्षक बनले तर नागरिकांची सुरक्षा कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरींगचं शिक्षण घेत होती. तिथे तिची ओळख एका तरूनासोबत झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं.
या प्रेमात तरुण आणि तरुणी या दोघांनीही खूप आणाभाका घेतल्या आणि गुपचूप लग्नही केलं. काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला. त्यामुळे तिने लग्नासाठी आग्रह केला. त्यावेळी त्याने तिला नकार दिला. खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराविरोधात तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
तरुणी त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली. यावेळी भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटं येण्यास सांगितलं. तरुणीला पोलीस अधिकाऱ्याचा उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्यावेळी त्यांनी तिला तिचं काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. अखेर तरुणीने याची माहिती सामजिक संघटनेला दिली.
त्यांच्यासोबत मिळून पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मुलीच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात 354 अ , 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात चौकशी सुरु झाली असून हा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला जाणार असल्याचं पोलीस अधिक्षक यांनी सांगितलं आहे.