उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे ता.२१:- आज राज्यात वट पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. वट पौर्णिमेच्या पारंपारिक पूजा पद्धतीबरोबरच ठीक ठिकाणी वड, पिंपळ यासारख्या वृक्षांचं नव्यानं रोपण करूनही वट पौर्णिमा साजरी करण्यात आली.
वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. त्यामुळे, वडाच्या झाडाला धार्मिक महत्व अधिक आहे. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते. तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकतः दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे, हा त्यामागचा हेतू आहे.
त्यामुळे राज्यात आज सकाळपासूनच महिलांनी सोळा शृंगार करत नवनवीन साळ्या परिधान करून वटवृक्षांचं पूजन व फेरे पूर्ण करीत वट पौर्णिमा साजरी केली.