पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणातून साडेचार वर्षांच्या मुलासह एका विवाहित महिलेने पलायल केले. त्यानंतर ती महिला नागपुरात वास्तव्यास असताना एका युवका बरोबर तिचे सुत जुळले. मात्र, या प्रियकराने दोघांत तिसरा नको म्हणून प्रेयसीच्या मुलाला चक्क एका ट्रेनमध्ये सोडून अपहरण झाल्याचा बनाव केला. मात्र, बिंग फुटताच गणेशपेठ पोलिसांनी मुलाला लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सुखरुप घरी आणले असून प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे. हंसराज ज्ञानेश्वर दखने वय 25 वर्ष , रा. पोरा, लाखनी, भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांन कडून प्राप्त माहितीनुसार 30 वर्षीय एका विवाहित महिलेने काही महिन्यांपूर्वी पतीशी वाद सुरू असल्याने आपल्या साडेचार वर्षांच्या मुलासह गाव सोडले. त्यांनतर ती नागपुरात आल्यावर एका हॉटेलमध्ये काम करून ती एका लॉजमध्ये मुलासह वास्तव्य करू लागली. यादरम्यान तिची हॉटेलमध्ये असलेल्या हंसराजशी ओळख झाली. काही दिवसातच दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले.
त्यामुळे दोघेही एकाच लॉजमध्ये सोबत राहू लागले. तिच्याशी लग्न करायचे असल्याने त्याला मुलगा अडसर वाटू लागला. त्यामुळे शुक्रवारी (ता.२१) सकाळी हंसराजने मुलाला शाळेत टाकण्याच्या बहाण्याने आपल्या सोबत नेले. दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास त्याला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर नेऊन वर्धा मार्गाने जाणाऱ्या रेल्वेत बसविले आणि तेथून पसार झाला.
घरी आल्यावर त्याने महिलेला तीन जणांनी मुलाचे अपहरण केल्याची बतावणी केली. महिलेने मुलाच्या अपहरणाची तक्रार गणेशपेठ पोलिसांकडे दाखल केली. गुन्हा दाखल करीत, पोलिस निरीक्षक पंडित यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक आष्टनकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. हंसराजला विचारणा केली असता, त्याने वेळोवेळी बदललेली साक्ष यातून पोलिसांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यामुळे त्याला खडसावून विचारणा केली असता, त्याने चिमुकल्याला रेल्वेत सोडल्याची माहिती दिली. ती मिळताच, लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने वर्ध्यातून मुलाला सुखरुप घरी आणले. याप्रकरणी पोलिसांनी हंसराजला बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत आहे.