पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दीक्षित नगरातील पंचमवैद्य आर्य सोसायटी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आपल्या पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्नीशी वाद घालून तिच्या डोक्यात लोखंडी सळाखीने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण नागपूर शहर हादरले आहे. मन्नत ऊर्फ मीनू दिलप्रीत विर्क वय 24 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून आरोपी पती दिलप्रीत ऊर्फ विक्की कुलविंदरसींह विर्क वय 30 वर्ष याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी दिलप्रीत याचे कपिलनगर चौकात किंग्स अॅसेसरीज नावाने कार डेकोरेशन आणि वाहनांच्या सुट्या भागाची विक्री करण्याचे दुकान आहे. गेल्या चार वर्षांपासून मृतक मन्नत आणि आरोपी दिलप्रीतचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना सांगून लग्न करून देण्याबाबत विचारणा केली. मात्र, घरच्यांनी त्यांच्या लग्नास नकार दिल्याने त्यांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दोघांनी प्रेमविवाह केला. त्यांना दोन वर्षांचा मुलगा झाला. गेली चार वर्षे सुरळीत संसार सुरु होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या मन्नतचे एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणा बरोबर सुत जुळले. त्याच्यात काही महिने प्रेमसंबंध सुरु होते. गेल्या काही दिवसांपूर्वी सदर परीसरात पत्नी मन्नत त्या युवकासोबत दिसली. त्यामुळे चिडलेल्या दिलप्रीतने घरी जाऊन पत्नीशी वाद घातला. त्यानंतर त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाची भेट घेऊन प्रेमसंबंध तोडण्याची तंबी दिली. काही दिवसांनंतर दोघांच्या पुन्हा भेटी व्हायला लागल्या. त्यामुळे चिडलेल्या दिलप्रीतने मन्नतच्या कुटुंबियांशी चर्चा करून पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती देऊन घटस्फोट घेण्याचा निर्णय कळविला.
अशा प्रकारे घडली घटना: मन्नतच्या अनैतिक संबंधा वरून पती-पत्नीत जोरदार वाद झाला. पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून दिलप्रीतने घरात तिच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने सपासप वार करून हत्या केली. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात घरात पडून असताना त्याने घराला कुलूप लावले आणि निघून गेला. मन्नतची मैत्रिण आणि भाऊ विशालने मन्नतला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नव्हती. भावाला संशय आल्याने तो तिच्या घरी गेला. त्याने घराचे दार तोडले असता बहिणीचा मृतदेह पडून दिसला.
याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी कपीलनगर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपी दिलप्रीतला अटक केली.