नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातून एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन अल्पवयीन मुली कपडे धुण्यासाठी गेल्या असताना अचानक तोल गेल्याने त्या नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्या. यावेळी या मुलींना वाचवण्यासाठी तिथे जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली. पण या दोन मुलींचा आणि वाचविण्याऱ्या एका मुलाचा अशा तिघांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण सावळेश्वर गावात हळहळ व्यक्त करत शोककळा पसरली आहे. कावेरी गौतम मुनेश्वर वय 15 वर्ष, अवंतिका राहुल पाटील वय 14 वर्ष, चेतन देवानंद काळबांडे वय 16 वर्ष या तिघांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला.
सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी गौतम मुनेश्वर वय 15 वर्ष आणि तिची मैत्रीण अवंतिका राहुल पाटील वय 14 वर्ष या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुतल्या नंतर या दोघीही अंघोळीसाठी नदीच्या पात्रात उतरल्या. पण यावेळी त्यांस पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली हे ऐकून या ठिकाणी असलेल्या चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे हे दोघे मदतीसाठी धावले.
तिघांचा मृत्यूने, गावात पसरली शोककळा. चेतन आणि शुभम या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली. घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. त्यानंतर गावकऱ्यांनी चौघांनाही नदी पात्रातून बाहेर काढले आणि ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून कावेरी, अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले. शुभम याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले आहे.