मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- शहरात काही महिन्यांपासून क्राईम रेट वाढला आहे. खूनी हल्ले, चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोऱ्या यासोबतच मारहाण होण्याचे प्रकार वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. दुचाकीच्या चोऱ्यांमध्ये कमालीची वाढ झाली असुन पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरला की नाही अशा प्रश्न आज नागरिकांना पडला आहे. अवैध व्यवसाय फोफावत असून तरुणाई नशेच्या विळख्यात अडकली आहे. ही परिस्थिती पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणारी आहे.
तीन दिवसांपूर्वी दारूच्या नशेत एका तरुणाने एक वुद्ध व्यक्तीचा दगडाने ठेचून भयावह हत्या केली. त्यामुळे देवळी शहरात वाढती गुन्हेगारीचा प्रश्न समोर आला आहे. या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील अनेक तरुणांनी देवळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, देवळीत एका निष्पाप व्यक्तीची नशेखोर युवकाने दगडाने ठेचून भयावह हत्या केली. या घटनेने संपूर्ण समाजमन हळहळले आहे. परिसरात नागरिक अस्वस्थ आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वाढते अवैध व्यवसाय व तरुणातील वाढती व्यसनाधीनता या घटने मागील कारण आहे. या अवैध धंद्यांना आळा घालून नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी व प्रत्येक मेन रोड वर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.