आ. सुभाष धोटेंच्या मागणीवर तातडीने प्रश्न मार्गी लावण्याची आरोग्यमंत्र्यांनी दिली ग्वाही.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:– महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राजुरा विधानसभा मतदार संघातील गोंडपिंपरी तालुका मुख्यालयाचे ठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम तातडीने करण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली असून यावर सभागृहात उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लवकरच संबंधित विभागाची बैठक आयोजित करून गोंडपिपरी येथे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची ग्वाही दिली आहे.
मागील अनेक दिवसांपासून आ. सुभाष धोटे यांनी येथे ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यात यावी यासाठी संबंधित विविध विभागाकडे प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदनाद्वारे मागणी केली मात्र संबंधित विभागाकडून अतिशय संवेदनशील विषयाकडे कमालीचे दुर्लक्ष होत होते त्यामुळे शेवटी हा प्रश्न त्यांनी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे लावून धरला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता लवकरच येथे नवीन रुग्णालय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोंडपिपरी येथे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे जूने बांधकाम सन १९८२ मध्ये करण्यात आले होते परंतु सदर इमारत सध्यास्थितीत पूर्णतः जीर्ण झालेली असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर यांच्या दिनांक २१ मार्च २०२३ रोजीच्या संरचनात्मक लेखापरीक्षण अहवालानुसार ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचे निष्पन्न झाले असताना सुद्धा या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग व महसूल विभाग गांभीर्याने लक्ष न देता परिसरातील गोरगरीब रुग्णांच्या जीविताशी खेळ खेळण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे जिल्हाशल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी वारंवार बैठक आयोजित करण्यात आल्या मात्र रुग्णालय इमारतीचे बांधकामाकरिता थोडी जागा कमी पडत असल्याने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना जागा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत मात्र याबाबत गंभीरतिने लक्ष देणे टाळत असल्यामुळे भविष्यात कधीही रुग्णांच्या जीविकास धोका होऊ शकतो. मोठी जिवीत हाणी होऊ शकते. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी सभागृहाच्या माध्यमातून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना इमारत बांधकाम करण्यास जागा कमी पडत असल्यास बाजूला असलेली जलसंपदा विभागाची वापरात नसलेली ९८ आर जागा तात्काळ आरोग्य विभागस करून घेण्याची कारवाई करण्याची आणि रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधकाम तातडीने पुर्ण करण्याची मागणी केली आहे.