पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची वरळी ऑफिसला तोबा गर्दी.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड ०२:- भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच आमदारांनी त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. पंकजाताईंची उमेदवारी दाखल करतेवेळी विधानभवन परिसरात तसेच वरळीच्या कार्यालयात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणूक होत असून आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपने पंकजा मुंडे सह आपल्या 5 उमेदवारांची घोषणा काल केली होती. आज सकाळी 11 वाजता पंकजा मुंडे यांनी विधानभवनात जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सकाळी त्यांनी श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले, त्यानंतर घरी आई प्रज्ञाताई, माजी खासदार डाॅ. प्रितम मुंडे यशःश्रीताई यांनी त्यांचे औक्षण केले.
मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छा. उमेदवारी दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, धनंजय मुंडे अतुल सावे, गोपाळराव पाटील आदी मंत्री तसेच आमदार व महायुतीच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यभरातून समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘पंकजाताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘लोकनेते मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला होता.
वरळी ऑफिसला तोबा गर्दी; कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू: विधानभवनात जाण्यापूर्वी पंकजा मुंडे सकाळी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात दाखल झाल्या. सकाळपासूनच परळी, बीडसह मराठवाडा व राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सर्वांना भेटून त्या अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्या. पुन्हा दुपारी एक 1 वाजता पासून सायंकाळ पर्यंत त्या कार्यकर्त्यांना भेटल्या त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत त्यांचेशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव कार्यकर्त्यांना अतिशय जिव्हारी लागला होता, आज उमेदवारी मिळाल्यानंतर मात्र कार्यकर्ते पंकजा मुंडे यांना भेटताना डोळ्यातील आनंदाश्रू लपवू शकले नाहीत.