संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- आज शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खामोना या ठिकाणी शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 2 कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वप्रथम सर्व नवीन भरतीपात्र विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांसोबत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बैलगाडी सजवून भजन मंडळी च्या तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक पुरूष, महिला, शि.व्य. स., ग्रामपंचायत आजी, माजी सदस्य उपस्थित राहून गावात प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेच्या परिसरात मुख्य कार्यक्रम साजरा करण्यात आला,
यावेळेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पोटे इतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रौढ पुरुष व महिला उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांचे स्वागत व शाळा पूर्वतयारीची गरज काय ? यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आठ आठवडे चाललेल्या ह्या कार्यक्रमात कृतीपत्रिका व गुणवत्तेकडे पहिले पाऊल या पुस्तिकेतून विद्यार्थ्यांना पालक व माता पालकांनी फायदा कसा झाला? याबद्दल विस्तृत माहिती शाळेचे मुख्याध्यापक संजय लांडे सर यांनी केले.
यावेळी सर्व नवीन भरती पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत प्रत्येक स्टॉलवर उपस्थित असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधीद्वारे कृती करून घेण्यात आल्या व भाषा विकास, गणनपूर्व तयारी, सामाजिक व भावनिक विकास, बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता याबद्दल कृती घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शाळा व शिक्षण याविषयी आवड निर्माण करण्याचे कार्य याप्रसंगी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी व शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी सर्व नवीन भरतीपात्र विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक तथा शाळेतील इतर वर्गातील विद्यार्थी या सर्वांना नास्ताचा आस्वाद गोड वस्तू सोबत देण्यात आला. सर्वांनी खूप आनंदाने व मौजेने हा दिवस स्मरणीय बनवण्यासाठी कृती व कार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानून आजच्या या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन अली सर यांनी केले तर प्रास्ताविक लांडे सर यांनी केले. मार्गदर्शन भोयर सर यांनी तर आभार तामगाडगे मॅडम यांनी केले.