आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी मोटर सायकलच्या चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे नागरिकात आपली दुचाकी मोटर सायकल सुरक्षित राहणार की नाही या भीतीत राहावं लागत आहे. त्यामुळे आर्वी पोलिसांनी अशा दुचाकी मोटर सायकल चोराचा टोळीचा पर्दाफाश करत धडक कारवाई केली.
दुचाकी चोरी करणाऱ्याच्या शोधात पोलीस असताना आर्वी पोलिसांनी एका दुचाकी चोरीचा तपास करत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी चार आरोपीना बेड्या ठोकल्या आहे. तर दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. हे चोरटे वर्धा जिल्ह्यातून दुचाकी चोरून वाशीम जिल्ह्यात विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्याचा तपास आर्वी पोलिसांकडून सुरु होता. अश्यातच धानोडी येथे चोरीची दुचाकी विक्रीकरिता एक युवक येत असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली. यावरून पोलिसांनी सपाळा रचत नयन मिलिंद गायकवाड वय १९, रा. कोसूर्ला याला दुचाकीसह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने वर्धा जिल्ह्याच्या आर्वी, सेवाग्राम, सावंगी, अल्लीपूर, खरागणा, सेलू येथील दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरताना आरोपी नयन सोबत वर्धेच्या येसंबा येथील साहिल डोंगरे व दोन विधीसंघर्षित बालक मदत करत होते. हे चोरटे दुचाकी चोरून वाशीम येथे जाऊन विक्री करत असल्याच समोर आले.
चोरीच्या 23 दुचाकी हस्तगत..
आरोपी हे दुचाकी चोरून वाशीम येथे सय्यद सलमान सय्यद साबीर व मोहम्मद फैजल मोहम्मद फिरोज याला विक्री करत होते. पोलिसांनी यांना देखील ताब्यात घेत विचारपूस करत चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणात आतापर्यंत 23 दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, रामकिसन कासदेकर, दिगंबर रुईकर, अमर हजारें, प्रवीण सदावर्ते, राहुल देशमुख, निलेश करडे, स्वप्नील निकुरे यांनी केली.