राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यातील बहुतांश भागांमध्ये रविवारपासूनच पावसानं जोर धरला असून, मुंबई शहरातील वाहतुकीवर पावसाचे परिणाम दिसत आहेत. शहरातील मुख्य वाहतुकीचं माध्यम असणारी मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा पावसामुळं कोलमडली असून, कार्यालयीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी पहाटेपासूनटच शहरातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं.
नोकरीच्या निमित्तानं ठाणे कल्याण, बदलापूर इथून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या रेल्वेसेवा पावसामुळं आणि रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळं कोलमडल्या. सायन कुर्ला दरम्यान रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. तर, तिथं हार्बर रेल्वे मार्गावरही हेच चित्र पाहायला मिळालं. हार्बरच्या मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ पावसाचं पाणी रुळांवर आल्यानं इथंही रेल्वेसेवा ठप्प झाली. काही क्षणांनी पाऊस कमी झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं पूर्वपदावर येताना दिसली. पण, रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी – ठाणे दरम्यानची फास्ट मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा ठप्प झाली. भांडुप, घाटकोपर, कुर्ल्यात पाणी साचल्यानं त्याचे थेप परिणाम रेल्वे वाहतुकीवर दिसत असून, तूर्तास अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सुरू आहे. पण, इथंही खोळंबा चुकलेला नाही. तिथं हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळं प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
मुंबईमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवांवरही परिणाम झाला असून, रस्ते वाहतुकीवरही या पावसाचा थेट परिणाम होताना दिसत आहे. शहरातील सायन, माटुंगा, दादर आणि हिंदमाता येथील सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळं रस्ते वाहतूक कोलमडली आहे. याचा थेट परिणाम इस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर होताना दिसत आहे. अंधेरी सबवे, वडाळा, शिवडी इथं पाणी साचल्यामुळं नोकरीसाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या प्रत्येकाचीच तारांबळ उडाली असून, इथून पुढं कोणी नोकरीसाठी निघणार असेल तर पाऊसपाणी आणि वाहतुकीची व्यवस्था लक्षात घेत त्यानुसारच प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
सोमवारी सकाळपासूनच नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडलेल्या असंख्य चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी केली असून, तिथं आता रेल्वेसेवा नेमकी कधी पूर्ववत होणार अशीच प्रतीक्षा अनेकजण करत आहेत. तर, काहींनी रस्ते मार्गानं अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठीचे प्रयत्न सुरु केल्यामुळं एकच गोंधळ माजल्याचं पाहायला मिळत आहे.