अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे होणारे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथेच व्हावे या मागणीसाठी वेळा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समितीच्या वतीने आयोजित मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान शहरातील कारंजा चौक येथून निघालेला हा मोर्चा विठोबा चौक, डॉ. आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालयावर नेण्यात आला. येथे समितीचे वतीने तहसीलदार सतिश मासाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वेळा आणि परिसरातील नागरिक, महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती.
मल कन्स्ट्रक्शन या कंपनीने वेळा येथे नवीन शासकीय महाविद्यालय साठी ४० एकर भूखंड देण्याची तयारी दर्शविली असता तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्या मार्फत हा अहवाल शासनाला पाठविला होता. दरम्यान जागा निश्चितीचा वाद हा राज्य विधान सभेत पोहचल्याने मल कन्स्ट्रक्शन यांनी हा प्रस्ताव मागे घेतला. परंतु वेळा येथेच हे प्रास्तावित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे यासाठी संरक्षण समितीने आज मल कन्स्ट्रक्शनच्या स्थानिक भागधारकांना सुद्धा निवेदन दिले.
हा लढा येथेच संपला नसून वेळा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू न केल्यास यापुढे सुद्धा तीव्र जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समितीचे वतीने देण्यात आला. या दरम्यान समितीचे एक शिष्टमंडळ मुंबई येथे राज्य अधिवेशनात जाऊन शासना कडे निवेदन सादर करीत पाठपुरावा करणार असल्याची माहिती संरक्षण समितीक्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
येत्या १२ जुलै पर्यंत वेळा येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थान निश्चित न केल्यास रास्ता रोको, चक्काजाम सारखे आक्रमक आंदोलन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.