हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात 27 विद्यार्थिनी अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याची खळबजनक माहिती समोर आल्याने वसतीगृहात प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. बाब वसतिगृह समितीच्या छाप्यात उघडकीस आली. विशेष म्हणजे, वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्राध्यापिका या भाडेकरू विद्यार्थिनीं कडून 12 ते 14 हजार रुपये प्रतिमाह भाडे स्वत:च स्वीकारत होत्या. दोन प्राध्यापिकांनी मिळून विद्यार्थिनींकडून आतापर्यंत 2 लाख 88 हजार रुपये भाडे म्हणून वसूल केले.
चंद्रपूर – बल्लारपूर बायपास मार्गावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात 150 विद्यार्थिनींचे स्वतंत्र वसतिगृह आहे. या वसतिगृहात महाविद्यालयातील विद्यार्थिनी वास्तव्याला आहेत. प्रा. रेखा सहारे व सहायक प्राध्यापिका श्रीमती खोब्रागडे या दोघींवर वसतिगृहाची जबाबदारी आहे. 150 विद्यार्थिनींची क्षमता असताना या वसतिगृहात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिनी वास्तव्याला असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी वसतिगृह समितीचे अध्यक्ष डॉ. ललीत ढोले, सचिव प्रा. शिशीर पाटील, प्रा. जामुनकर, प्रा. भोवरे व प्रा. मोरे या पाच जणांच्या समितीने रात्री अचानक वसतिगृहात छापा टाकला. यावेळी वसतिगृह समितीने संपूर्ण वसतिगृहाची तपासणी केली असता 27 विद्यार्थिनी जास्त मिळून आल्या. या सर्व २७ विद्यार्थिनींचा जबाब व तक्रारी समितीने नोंदविल्या. या सर्व विद्यार्थिनींनी प्रा. सहारे व प्रा. खोब्रागडे यांना 12 ते 14 हजार रुपये प्रति माह भाडे देत असल्याची कबुली दिली.
चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात घोटाळा करणाऱ्या प्रा. सहारे व प्रा. खोब्रागडे यांनी आतापर्यंत विद्यार्थिनींकडून अवैधपणे 2 लाख 88 हजार रुपये वसूल केल्याचे समितीच्या पाहणीत आढळून आले. मागील दोन वर्षांपासून हा प्रकार वसतिगृहात सुरू होता, अशी माहिती वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या एका विद्यार्थिनीने बोलताना दिली. या दोन्ही प्राध्यापिकांविरुद्ध शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत वाशीमकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
किराया वसुलीसाठी 5 महिला बाऊंसर: प्राध्यापिकांनी वसतिगृहात अनधिकृपणे वास्तव्याला असलेल्या या मुलींकडून भाडे वसुलीसाठी 5 महिला बाऊंसरची नियुक्ती केली होती. या सर्व बाऊंसरदेखील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या दोन्ही प्राध्यापिकांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉ. वाशीमकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. प्रशांत वाशीमकर यांच्याशी संपर्क साधला असता, मागील शैक्षणिक वर्षात ही घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाला याबाबतची माहिती दिली आहे, असे सांगितले.
विद्यार्थिनींच्या जेवणाचा मेसमध्ये मोठा घोटाळा: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मेस आहे. तिथे जवळपास २५० मुली रोज जेवण करतात, यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीकडून 1750 रुपये शुल्क आकारले जाते. तिथेही अशाच प्रकारचा घोळ झालेला आहे. हा घोटाळा जवळपास 50 लाखांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाची देखील चौकशी सुरू आहे.