आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दिनांक 17 जुलै रोजी मोहरम व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी सर्वत्र साजरे करण्यात येणार असल्याने सदर सण– उत्सव शांततेत व सौहार्द पूर्ण वातावरणात पार पडावे या करिता पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे पोलीस अधीक्षक वर्धा नूरूल हसन यांचे मार्गदर्शनात शांतता समिती सदस्य व मोहरम आयोजक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत पोलीस स्टेशन वर्धा शहर, पोलीस स्टेशन रामनगर, पोलीस स्टेशन सावंगी, पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील ठाणेदार तसेच त्यांच्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे शांतता कमेटी सदस्य तसेच मोहरम आयोजक सदस्य हे पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष हजर होते तसेच उर्वरित पोलीस स्टेशन येथील ठाणेदार आणि शांतता समिती सदस्य व मोहरम आयोजक हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सदर मिटिंगला हजर होते.
यावेळी पोलीस अधीक्षक वर्धा यांनी स्वतः जिल्यातील ठाणेदार आणि शांतता कमेटी सदस्य व मोहरम आयोजक यांना सदर सण उत्सव दरम्यान निघणाऱ्या मिरवणूक, दिंडी या शांततेत पार पाडण्यासंदर्भात तसेच कुठल्याही समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही या संदर्भात सूचना दिल्या. यावेळी या बैठकीला पोलीस अधीक्षक वर्धा नूरुल हसन, तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे आणि जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि शांतता कमेटी सदस्य व मोहरम आयोजक सदस्य हजर होते.