युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील मोहपा नजीकच्या रानवाडी शिवारातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास वीज पडून एकाच वेळी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रभाकर केशवराव रेवतकर वय 65 वर्ष आणि हिराबाई प्रभाकर रेवतकर वय 60 वर्ष अशी मृतकांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर रेवतकर यांनी मोहपा येथील प्रदीप महाजन यांचे रानवाडी शिवारातील शेत भाडेतत्त्वावर केले आहे. या शेतात त्यांनी कपाशीची लागवड केली आहे. कपाशीला खत देण्यासाठी प्रभाकर आणि त्यांची पत्नी हिरा शेतात गेले होते. आज मोहपा परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला. पावसात विजांचे प्रमाण खूप होते. शेजारच्या भीमराव निमकर यांच्या शेतात मरामायचे मंदिर आहे. पाऊस सुरू असल्यामुळे त्या मंदिरात आडोशासाठी हे दोघेही पती-पत्नी थांबले होते.
दुपारी साडे तीनचे सुमारास त्या मंदिरावर आणि त्यामागील मोहाचे झाडावर वीज कोसळली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. नजीकच्या सुधीर चिमोटे यांच्या शेतातील कामगार महिलांना सर्वप्रथम ही घटना माहीत झाली. त्यांनी गावात फोनवर घटनेची माहिती दिली.
मृतकांना नरेंद्र, किशोर आणि नरेश अशी तीन मुले आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पंचनामा करून दोन्ही मृत्युदेह कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेली असून पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहेत.