श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड शहरातील ज्वलंत अशा पाणी प्रश्नावर बैठक (VC) संपन्न झाली. वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याकारणाने शहरातील जनता किती हाल अपेष्टा सहन करत आहे याची जाणीव पालकमंत्र्यांना असल्या कारणाने पालकमंत्र्यांची शस्त्रक्रिया झालेली असतानाही त्यांनी थेट रुग्णालयातून VC द्वारे बैठकीत सहभाग घेतला. आजच्या बैठकीत गटनेते फारुख पटेल यांनी बीड शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठा संदर्भात पोट तिडकीने भूमिका मांडली.
पुढील महिन्यात 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी मुंबई येथे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री ना. अजितदादा व ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत बीड शहरातील पाणी प्रश्नावर अंतिम बैठक पार पडेल असे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब यांनी आश्वासित केले. तसेच महावितरण कंपनीची थकीत वीज बाकी भरण्याकरिता जिल्हा नियोजन समिती व इतर माध्यमातून तरतूद करण्यासंदर्भात आश्वासित केले. तसेच या प्रश्नासंदर्भात शासनाच्या सर्व विभागांनी सकारात्मक भूमिका घेऊन पावले उचलावीत असेही सूचित केले.
या बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मुंबई येथून नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तर बीड येथून गटनेते फारुख पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, श्री कांबळे पालिका प्रशासन अधिकारी, श्रीमती नीता अंधारे मुख्याधिकारी नगरपरिषद, बीड, श्री राहुल टाळके उपअभियंता पाणीपुरवठा नगरपरिषद बीड, सय्यद अर्षद उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बीड आदी उपस्थित होते.