प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दि.7 ऑगस्ट 2024 पासून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचे अनुदान डी.बी.टी पोर्टलव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. वर्धा तालुक्यातील संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्याप पर्यंत हयात प्रमाणपत्र (जीवन प्रमाणपत्र) तसेच आवश्यक कागदपत्रे सादर केली नाही. अशा लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्रे सादर करावी असे, आवाहन तहसिलदार वर्धा यांनी केले आहे.
वर्धा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या (शहर) 6 हजार 700 लाभार्थ्यांपैकी 4 हजार 683 लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर केले असून उर्वरीत 2 हजार 17 लाभार्थ्यांनी अद्याप पर्यंत हयात प्रमाणपत्र सादर केले नाही. अशा लाभार्थ्यांनी स्वत:चे आधार बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे. आधारकार्ड बँक खात्याला लिंक आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. तसेच लाभार्थ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, मृत्यु प्रमाणपत्र, जिल्हा शल्य चिकित्सकाचे अपंग प्रमाणपत्र, हयात प्रमाणपत्र, राशनकार्ड व मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे तात्काळ तहसिल कार्यालय वर्धा येथे सादर करावी. अन्यथा लाभार्थ्यांना अनुदान खात्यात जमा करणे शक्य होणार नाही.
ज्या लाभार्थ्यांना तहसिल कार्यालयात येणे शक्य नसल्यास त्यांनी तलाठी किंवा कोतवाल यांचेकडे कागदपत्रे जमा करावी. कोणत्याही खाजगी व्यक्तीकडे कागदपत्रे देऊ नये. कागदपत्रे शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांची यादी तलाठी व तहसील कार्यालयात उपलब्ध असून यादीमध्ये नाव तपासून व खात्री करुनच कागदपत्रे जमा करावी. जे लाभार्थी सदर कागदपत्रे विहित कालावधीत सादर करणार नाही. अशा लाभार्थ्यांचे अनुदान बँक खात्यात जमा करणे शक्य होणार नाही. याची नोंद सर्व लाभार्थ्यांनी घ्यावी, असे तहसिलदार वर्धा यांनी कळविले आहे.