आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा मतदार संघाची मतदान केंद्रनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत उपस्थित होते.
आज (दि.6) प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये नागरिकांनी नाव तपासण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या 11 लाख 1 हजार 877 असून त्यामध्ये 5 लाख 59 हजार 843 पुरुष मतदार, 5 लाख 42 हजार 22 स्त्री मतदार व 12 इतर मतदारांचा यामध्ये समावेश आहे.
44-आर्वी विधानसभा मतदार संघात 2 लाख 59 हजार 248 मतदार, 45-देवळी विधानसभा मतदार संघात 2 लाख 68 हजार 308, 46- हिंगणघाट विधानसभा मतदार संघात 2 लाख 91 हजार 191 व 47-वर्धा विधानसभा मतदार संघात 2 लाख 83 हजार 130 मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात चारही विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्राची संख्या 1 हजार 342 असून 44-आर्वी विधानसभा मतदार संघात 310 मतदान केंद्र, 45-देवळी विधानसभा मतदार संघात 335 मतदान केंद्र, 46-हिंगणघाट विधानसभा मतदार संघात 351 मतदान केंद्र व 47-वर्धा विधानसभा मतदार संघात 346 मतदान केंद्रांचा समावेश आहे.
प्रारुप मतदार यादीवर दावे, हरकती, आक्षेप स्विकारण्याचा कार्यक्रम घोषित झाला असून 6 ते 20 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे, हरकती, आक्षेप स्विकारण्यात येणार आहे. दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे. तसेच 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
नव मतदारांची नोंदणी, नावामध्ये दुरुस्ती, वगळणी, आधार जोडणी सुलभ होण्यासाठी 10 व 11 ऑगस्ट 2024 तसेच 17 व 18 ऑगस्ट 2024 रोजी या चार दिवशी विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव तपासणी करुन त्यामध्ये नवीन मतदार नोंदणी, नावांची दुरुस्ती, मृत अथवा कायम स्वरुपी स्थलांतरण झालेल्या मतदारांची वगळणी व आधार जोडणी करुन घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.