युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन सावनेर, 9 ऑगस्ट:- सावनेर नगर परिषदेसमोर एक ऐतिहासिक महिला मार्च पार पडला. आम आदमी पार्टी सावनेरच्या नेतृत्वाखाली हा मार्च सावनेर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करण्यात आला. या महिलांनी आपल्या आवाजाच्या शक्तीने सावनेरच्या रस्त्यांच्या समस्यांना सरकारच्या कानांवर पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
1 ऑगस्ट 2024 रोजी नगरपरिषद सावनेरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी यांना शहरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत एक निवेदन आम आदमी पार्टीचे पंकजकुमार घाटोडे यांच्याकडून सादर करण्यात आले होते. या निवेदनात शहरातील खराब रस्त्यांवर मुरूम टाकण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच, शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या प्रश्ना बाबतही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती, ज्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी मुरूम टाकण्याचे काम चालू असल्याचे सांगितले होते, परंतु आम आदमी पार्टीने केलेल्या पाहणीत असे आढळले की, कोणत्याही ठिकाणी मुरूम टाकलेले दिसत नाहीत आणि मोकाट गुरे सुद्धा रोडवर त्याच परिस्थिती मध्ये दिसत आहेत.
आज, जटाशंकर, सटवा माता मंदिर स्वराज टाऊन वॉर्डमधील महिलांनी महिला मार्चमध्ये सामील होऊन नगर परिषदेसमोर हल्लाबोल केला. आम आदमी पार्टी कडून स्मरणपत्र पंकजकुमार घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली श्री कलेसर यांना सादर करण्यात आले. जटाशंकर वॉर्डमधील महिलांनी आपल्या समस्या श्री कलेसर यांच्यापुढे मांडल्या आणि तातडीने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. महिलांनी स्पष्ट केले की, पुढील सात ते आठ दिवसांत रस्त्यांवरील गड्ड्यांची योग्य दुरुस्ती न झाल्यास, आम आदमी पार्टीकडून चिखल आंदोलन करण्यात येईल.
सावनेरच्या रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे आणि जनतेचे हाल झालेले आहेत. पंकजकुमार घाटोडे यांनी सावनेरच्या जनतेला आवाहन केले की, आपल्या समस्या त्वरित आम आदमी पार्टीच्या कार्यालयात नोंदवा, जेणेकरून त्या समस्यांचे निराकरण अधिकाऱ्यांकडे योग्य पद्धतीने मांडता येईल. त्यांनी सावनेरच्या जनतेला आश्वासन दिले की, येणाऱ्या काळात त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे प्रयत्न केले जातील.
सावनेर शहरातील हा महिला मार्च आणि आम आदमी पार्टीचे नेतृत्व हा शहरातील विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. आता, शहरातील लोकांना या आंदोलनाचा किती प्रतिसाद मिळेल आणि सावनेर नगर परिषद त्यावर कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.