आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.11:- बाजारात किंवा इतर व्यक्तीद्वारे महाशक्ती आर. आर. (HTBT) किंवा बी.जी. 3 ईत्यादी नावाने बियाणे जिल्हयामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतक-यांनी आर.आर नावाचे कोणतेही अनधिकृत कंपनीचे किंव्हा इतर प्रतिनिधी द्वारे पेरणीसाठी बियाणे घेण्यात येवु नये. कारण असे बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात आलेले असल्यामुळे अशा बियाण्यापासुन शेतकऱ्यांचे नुकसान होते व अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्याचे कोणतेही बिल किंवा परवाना नसतो त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही.
शेतक-यांनी बियाणे खरेदी करतांना खालील प्रमाणे काळजी घ्यावी: बियाणे खरेदी करतांनी अधिकृत परवाना असणाऱ्या कृषि सेवा केंद्रातुन बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, पिशवी, टंग इत्यादी जपुन ठेवावे. पॉकिटावर लॉट नंबर, अंतिम मुदत, उगवण शक्ती इत्यादी बाबी तपासुन घ्याव्यात. बियाणे पॉकीट योग्य वजनाचे असल्याबाबत खात्री करावी.
कोणीही शेतकऱ्यांना असे बोगस बियाणे विक्री करीत असल्यास कृषि विभागाशी संपर्क साधावा. किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३४०००, ०७१५२-२५००९९ वर तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषि विकास अधिकारी, संजय बमनोटे यांनी केले आहे.