आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.12:- औषधी गुणर्धम असलेल्या रानभाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. या रानभाज्यांची ओळख सर्वसामान्याना व्हावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या रानभाजीचा नागरिकांनी आहारात समावेश करावा, असे आवाहन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सन 2024-25 अंतर्गत शितल मंगल कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.नलीनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी सारीका ढुके यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार श्री. भोयर म्हणाले की, फास्टफुडच्या जगात फळ आणि भाज्याची जागा पिझ्झा बर्गर यांनी घेतली आहे नवीन पीढीला शेतशिवारात उगवत असलेल्या भाज्याची ओळख व्हावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी रानभाजी महोत्सवामध्ये 40 स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये कुंजर, अंबाडी, पाथरी, कारडु, कपाळफोडी, गवती चहा, शेवगा, करवंद, अळू धोपा, चिवर, गोडनिम, तरोटा, राजगिरा, आघाडा, केना, सुरण, फास, बरबटी, कुकडा, घोगली, गोगलगाय भाजी, ताजे मशरुम, भुईनीम, आंबटचुका, मायाळु पोई, माठ, गुळवेल, करवंदाचे लोणचे, अंबाडीचे पदार्थ सरबत, पावडर, भाकर, लोणचे, बेलाचे लोणचे, सरबत यासारख्या विविध प्रकारच्या रानभाज्या व विविध प्रकारचे लोणचे, सरबत प्रदर्शनात विक्रीकरीता उपलबध होते.
कपाळफोडीची विशेष मागणी.
देवळी तालुक्यातील शेतकरी किशोर लोखंडे यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या कपाळफोडी भाजीला विशेष मागणी होती. औषधीगुणधर्म असलेली कपाळ फोडीचा वापर केशसंवर्धनासाठी होतो. कानदुखी व कानफुटीत कानात पू झाल्यास या पानांचा रस कानात टाकला तर दुखण्यावर आराम लागतो. मासिक पाळी नियमित होत नसल्यास याचा वापर करण्यात येतो. जुनाट खोकला छाती भरणे विकारात उपयुक्त आमवातात मुळांचा काढा करतात. यांचा वापर औषधी म्हणून खूप महत्वाचे असल्याने त्यांनी सांगितले. रानभाजी महोत्सवामध्ये शेतकरी, महिला बचत गट यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.