नागरिकांनी घरोघरी तिरंगा लावावा आमदार डॉ. पंकज भोयर
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नागरिकांनी घरोघरी तिरंगा लावून भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो वर्धा, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नगर परिषद, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठ, वर्धा संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा सायकल रॅलीचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जिल्हा क्रीडा संकुल येथून करण्यात आला. त्यावेळी आयोजित केलेल्या समारोप समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. कृष्णकुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर कवडे, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, कुलसचिव आनंद पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिषा भडंग, शिक्षणाधिकारी प्राथमिक नितू गावंडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार श्री. भोयर म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. त्याची सुरूवात गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा येथून आज करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आपल्या भारत देशाच्या तिरंग्याचा अभिमान जगभरात जावा याकरिता हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. आज नागरिकांनी रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव 16 ऑगस्ट पर्यंत मोठ्या उत्साहात राबविण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. कर्डिले म्हणाले की, देशभक्तीची भावना नवीन पिढीत रुजविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा ही मोहीम आज राबविण्यात आली. विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे नवीन पिढीपर्यंत देशभक्तीची भावना रुजविण्या साठी रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. या रॅलीला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद प्राप्त झाला. नागरिकांनी हर घर तिरंगा हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन सायकल रॅलीचा रॅलीला शुभारंभ करण्यात आला. देशभक्तीपर घोषणांनी जयघोष करण्यात आला. ही रॅली महात्मा गांधी चौक, विश्रामगृह, आरती चौक, शिवाजी चौक, बजाज चौक मार्गे फिरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका जवळील जिल्हा क्रिडा संकुल येथे राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये सर्वत्र तिरंगा झेडा हातात घेवून देशप्रेमाचा संदेश देण्यात आला. या रॅलीत पोलीस विभागाचा सायबर जनजागृती चित्ररथ विशेष आकर्षण ठरले..
जिल्हा प्रशासनातील केंद्र व राज्य शासनातील सर्व विभागांच्या अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, सामजिक संघटना आणि नागरिकांनी सहभाग घेतला. संचालन व आभार क्रिडा अधिकारी अनिल निमगडे यांनी केला.
संकेतस्थळावर सेल्फी अपलोड करा: घरोघरी तिरंगा मोहिमेंतर्गत 15 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावा. तसेच मोहिम कालावधीत तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे, यासर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.