मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील एटापल्ली तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहुसंख्य हे आदिवासी असलेले करपनफुंडी गाव दोन लोकांच्या हत्याकांडाने हादरले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जादूटोणाच्या संशयातून हे हत्याकांड घटना घडली अशी चर्चा संपूर्ण गावात रंगली आहे.
येमली बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील करपनफुंडी गावातील एका दाम्पत्याची हत्या करून मृतदेह बांडे नदीत फेकलेले मिळून आले. यावेळी पत्नीचा हातापायाला दोरी आणि दगड बांधलेल्या स्थितीतील मृतदेह बांडे नदीत मिळून आले. या आदिवासी बहुल गावात रैनू जंगली गोटा आणि बुर्गो रैनू गोटा हे वृद्ध दाम्पत्य राहात होते. रैनू हे पुजारी होते. तर त्यांची पत्नी बुर्गो ही शेतीचं काम पाहात होती. शेतीत धान आल्याने हे दोघेही सध्या घरा ऐवजी शेतीत राहात होते. पण सोमवार पासून हे दोघे दाम्पत्य गायब होते. त्यांचा शोध घेतला गेला. त्यानंतर गावातल्या जांभिया आणि बांडे या नद्यांच्या संगमावर या दोघांचे मृतदेह आढळून आले.
सोमवारी गायब झाल्यानंतर मंगळवारी बुर्गो रैनू गोटा, वय 55 यांचा मृतदेह नदीच्या संगमावर सकाळी दहाच्या सुमारास आढळून आला. हा मृतदेह दोरीने बांधला होता. त्यांचे हात पाय बांधले होते. शिवाय शरीरावर भला मोठा दगडही बांधला होता. त्यामुळे हा जादूटोण्याचा प्रकार असावा असे प्रथमदर्शनी गावातील लोकांनी शंका व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या पतीचा मृतदेह मिळत नव्हता. पण बुधवारी रैनू गोटा यांचाही मृतदेह त्याच ठिकाणी आढळून आला. त्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले आहे.
ज्या गावात हे हत्याकांड झाले ते गाव अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे आहे. त्यामुळे इथे जादूटोणा सर्रासपणे सुरू असतो. आता पर्यंत या भागात जितके खून झाले आहेत ते जादूटोण्यातूनच झाले आहेत. त्यामुळे हे हत्याकांड जादूटोण्यातून झाल्याचा पोलीसांचाही अंदाज आहे. शिवाय मालमत्तेतून ही हे हत्याकांड घडले काय याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या दाम्पत्याची हत्या झाली, त्यांना सहा मुले आहेत. शिवाय त्यांच्याकडे चांगली शेतीही आहे.
त्यामुळे मालमत्तेच्या वादातून तर हे हत्याकांड नाही झाले ना? या अँगलचाही विचार पोलीस करत आहे. हे गाव अत्यंत दुर्गम ठिकाणी आहे. त्यामुळे या हत्येचा तपास करण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलीसांसमोर असणार आहे. शिवाय शेतात हे दाम्पत्य एकटेच राहात होते. त्यामुळे काही चोरट्यांनी तर हे कृत्य केले नाही ना याचाही शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू असून अजून कोणतेही ठोस कारण पोलीसांच्या हाती लागलेले नाही.