उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली दि. 1:- श्रावस्ती बुद्ध विहार सांगली येथे वर्षावास प्रवचन संस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या संस्कार कार्यक्रमाकरिता धम्म देसना देण्यासाठी कवी सुजित कांबळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सर्वांना समजेल उमजेल अशा सहज सोप्या भाषेत धम्म देसना दिली.
यावेळी कवी सुजित कांबळे म्हणाले की, विश्वातील समस्त मानवाचे हित होण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी दिलेला बौद्ध धम्म अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच महाविद्वान, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण अभ्यासांती बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे. बौद्ध धम्मच हा मानवाला तारणारा आहे. बौद्ध धम्मात समता, बंधुता, स्वातंत्र्य आहे. तथागत गौतम बुद्धांनी अडीज हजार वर्षांपूर्वी अत्त, दीप, भव सांगितले आहे. याचा अर्थ स्वतः प्रकाशमान व्हा असा आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, माणूस हा त्याच्या कर्तुत्वानेच मोठा होतो म्हणून माणसाने नेहमी कुशल अर्थात पुण्य कर्म करत राहिलं पाहिजे. कोणाचा द्वेष करू नये, निंदा करू नये, मैत्री भावनेने सर्वांशी राहावे, यातच खऱ्या अर्थाने प्रगती आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांनी याकरिता तथागत गौतम बुद्धांना गुरु मानले होते, कारण बुद्धांची शिकवण त्यांनी शालेय जीवना पासून अभ्यासली होती. म्हणून बाबासाहेब महाविद्वान घडले. त्यामुळे बौद्धांनी जबाबदारीने वागून, जास्तीत जास्त बौद्ध धम्म आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे उचित आहे. बौद्ध धम्म स्वीकारायला सोपा आहे. तो आचरणात आणणे कठीण आहे. म्हणून तो आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे अशा आशयाचे विचार सुजित कांबळे सरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रावस्ती बौद्ध विहाराचे संस्कार केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी सुजित कांबळे सरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर विहाराचे सरचिटणीस संभाजी माने यांनी प्रास्ताविक केले, तसेच विहाराचे पदाधिकारी आठवले सर यांनी अन् घाडगे सर यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष, सीनियर डिव्हिजन ऑफिसर बौद्धाचार्य जितेंद्र कोलप गुरूजी उपस्थित होते. तसेच बौद्ध उपासक बौद्ध उपासिका उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेने करण्यात आली.

