हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पूर्ण चंद्रपूर विधानसभेतील शाळांना भेटी देऊन तेथील कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना टिफीन (जेवणाचा डबा) वाटत आहे. ज्यांना लाख रुपये पगार व ट्युशनची भक्कम वर कमाई आहे, असे शिक्षक सुध्दा हे टिफीन हसत हसत स्वीकारत आहे. फुकट मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे. हा मोठा उदांत थोर हेतू या शिक्षकांचा आहे.
आमदार लोक प्रतिनिधी म्हणून लोकांचा हक्काचे, संवेधानिक अधिकाराचे रक्षण करणे, त्याचा समस्या सोडविणे हे तुमचे प्रथम कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्याचे पालन न करता लोकांना टिफीन चे वाटप करून आपण मताचा जोगवा मागत आहे. हे तुम्हाला शोभत नाही, ज्या कॉन्व्हेन्ट (इंग्रजी माध्यम) शाळे मध्ये तुम्ही टिफीन वाटप केले त्या शाळेतील शिक्षकाला दोन वेळ पूर्ण पोट जेवण जेवता येईल इतका पगार मिळतो का ? नाही त्या शिक्षकांना नियमा प्रमाणे पगार मिळत नाही, महिला शिक्षकांना प्रसूती काळात नियमा प्रमाणे प्रसूती करिता सुट्या सुध्दा मिळत नाही इतका अत्याचार असतो या खाजगी कॉन्व्हेन्ट शाळेत.
कॉन्व्हेन्ट शाळा म्हणजे तुम्ही सर्व लोक प्रतिनिधींचा नाकावर टिच्चून एक अतीभ्रष्ट प्रति शिक्षण व्यवस्था आहे. या विरुद्ध तुम्ही कधी बोलाल आमदार साहेब ? लोकांना टिफीन वाटप करणे, वॉटर बॅग वाटणे, लोकांना जेवण देणे, कपडे वाटणे हि दान देण्याची कामे लोकप्रतिनिधीची नाही, या करिता लोक तुम्हाला निवडून देत नाही, या करिता अनेक सामाजिक संस्था, दानशुर व्यक्ती समाजात आहेत.
विद्या निकेतन शाळेत तुम्ही आले टिफीन दिले पण शिक्षकाचे हक्क कधी मिळवून देणार? शिक्षक महिलांना प्रसूती रजेचा हक्क, पेन्शनचा हक्क, नियमा प्रमाणे वेतनाचा हक्क, ग्राज्यूटी चा हक्क कधी मिळवून देणार? मागील निवडणुकीत तुम्ही दूरदर्शन हे चिन्ह घेऊन स्वतंत्र उभे होते कॉन्व्हेन्ट शिक्षकांचा समस्या सोडविणार, त्यांना नियमा प्रमाणे वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे वचन तुम्ही दिले होते. महिला शिक्षकांवर होणारे अन्याय तुम्ही थांबवणार असेही वचन तुम्ही दिले होते. त्यासोबत कॉन्व्हेन्ट विद्यार्थ्याना सर्व शासकीय सवलतीचा, शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा म्हणून तुम्ही प्रयत्न करणार होते. तुमच्या भुल-थापाना भुलून लोकांनी तुम्हाला प्रचंड मतांनी निवडून दिले पण तुम्हालाच तुमचा वचनाचा (दिलेल्या शब्दाचा) विसर पडला. खरं पाहता तुम्हाला शिक्षकांचा समस्या सोडवायच्या नाही तुम्हाला संस्था चालकांना मदत करायची आहे. त्यांच्यासोबत मैत्री कायम ठेवायची आहे, म्हणून तुम्ही पूर्ण 5 वर्षे कॉन्व्हेन्ट शिक्षकांचा समस्याकडे दुर्लक्ष केले. असे तरी तुमच्या आता पर्यंत केलेल्या कार्यातून दिसून येत आहे.
शिक्षकावर सुरू असलेल्या अन्याया विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (कॉन्व्हेन्ट विभाग) चा वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात दोनदा निवेदन देण्यात आले. पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या कडून त्याला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे अल्प पगारी शिक्षकांचा समस्या सोडविण्या करिता आमदार साहेब तुमच्या कडे वेळ नाही मग तुम्ही लोक प्रतिनिधी कोणत्या कामाचे ? कॉन्व्हेन्ट शाळा हि लोकांना उपाशी ठेऊन त्यांचे रक्त शोषणारी व्यवस्था आहे. असे परखड मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (कॉन्व्हेन्ट विभाग) यांच्या वतीने महाराष्ट्र संदेश न्युजला दिलेल्या प्रेस रिलिज मध्ये सांगण्यात आले.