मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शाहलंगडी जवळील वृंदावन डेअरी येथे रविवारी नारायण सेवा मित्र परिवारातर्फे राधाअष्टमी व अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत सुरेश शास्त्री महाराज, आमदार समीर कुणावार, समाजसेवी श्रीमती लता मोहता, किरण मुनोत आणि नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी उपस्थितांना तुळशीचे (वृंदा) वाटप करण्यात आले. तसेच अभियंत्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. ज्यामध्ये सुहास घिनमिने, विश्रांती कुंटेवार, प्रा. किरण वैद्य, पराग मुडे, नितीन कटकमवार यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार समीर कुणावार यांनी नारायण सेवा मित्र परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले व संस्थेच्या भविष्यातील प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला. महंत सुरेश शास्त्री महाराज यांनी कार्यक्रमात राधाअष्टमीचे महत्त्व विशद करून राधाअष्टमीचा उत्सव अतिशय सुंदर व चांगला झाल्याचे सांगितले. तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकात अध्यक्ष महेश अग्रवाल म्हणाले, “आमचा उद्देश अभियंत्यांचे अमूल्य कार्य ओळखणे आणि आध्यात्मिक आणि पर्यावरण विषयक जागरूकता वाढवणे हा असून,या कार्यक्रमाने दोन्ही उद्दिष्टे साध्य केली असा आमचा विश्वास आहे. संचालनासह उपस्थितांचे आभार पराग मुडे यांनी मानले. या कार्यक्रमाला नारायण सेवा मित्र परिवारातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.