राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबईसह राज्यात सर्वत्र गणपतीचे विसर्जन उत्साहात पार पडले. पण भिवंडी येथून एक खळबळजनक माहिती समोर आली. येते गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दरम्यान काही समाज कंटकांनी विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली. यावरुन दोन गट आमने-सामने आले असून काही वेळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीच्या प्रकारानंतर गणेश मंडळानी आक्रमक भूमिका घेतली. तर दुसऱ्या बाजूचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात जमा होण्यास सुरुवात झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मग पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
मंगळवारी भिवंडीत गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात सुरु होता. रात्री 12 वाजताच्या सुमारास घुघट नगर येथून विसर्जनासाठी गणपतीची मुर्ती नदीनाका कामवारी नदीकडे घेऊन चालले होते. ही मिरवणूक वंजरपट्टी नाक्यावरुन जात होती. त्याचवेळी दुसऱ्या गटाबरोबर शाब्दीक बाचाबाची, वादावादी झाली. दुसऱ्याबाजूच्या काही मुलांनी मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी गोंधळ घातला. संतप्त जमावाने दुसऱ्या गटाच्या एका तरुणाला पकडलं आणि त्याला मोठ्या प्रमाणात मारहाण केली. तिथे आलेल्या पोलिसांनी जमावा पासून या तरुणाची सुटका केली.
काही क्षणात दोन्ही बाजूचे लोक जमले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस पोहोचले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. घटनेबद्दल कळताच काही अन्य मंडळाचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. दुसऱ्याबाजूचा जमाव सुद्धा जमू लागला. पाहता-पाहता दोन्ही बाजूचे लोक जमल्याने मोठा तणाव निर्माण झाला.
परिस्थिती हाताबाहेर जातेय.. परिस्थिती बिघडू लागताच डीसीपी, एसीपीसह मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी जमावाची समजून काढण्याचा प्रयत्न करत होते. दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या अटकेच्या मागणीवरुन जमाव आक्रमक झाला. त्यांनी गणपति विसर्जन करण्यास नकार दिला. या दरम्यान पोलीस आणि विरोध करणाऱ्या जमावामध्ये धक्का-बुक्की सुरु झाली. परिस्थिती हाताबाहेर जातेय असं दिसताच पोलिसांनी लाठीचार्ज केला.