पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली. शहरातील सीताबर्डी पोलीस स्टेशन परिसरात एका बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या सहकाऱ्यासह दोन युवकांना बेदम मारहाण करून त्यांना लुटल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. यावेळी आरोपींनी पीडित युवकांकडून 4 हजार रुपये रोख आणि सोनसाखळी असा 84 हजार रुपयांचा माल लुटून पळ काढला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हितेश शंकरराव भराडकर वय 25 वर्ष यांनी सीताबर्डी पोलिस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी परवेज बाळापुरे वय 40 वर्ष आणि प्रसाद साखरे वय 24 वर्ष यांच्याविरुद्ध विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस परवेज बाळापुरे याला दारू तस्करी प्रकरणात सहभाग आढळल्याने त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
पिढीत हितेश हा चंद्रपूरचा रहिवासी आहे. गणेशोत्सवा निमित्त तो नागपुरात राहणाऱ्या भावाकडे आला होता. बुधवारी हितेश विसर्जन पाहण्यासाठी आपला मित्र अभिलाष रायपुरे बरोबर धरमपेठेत परिसरात फिरत होता. रात्री 10.00 सुमारास दोघेही ट्रॅफिक पार्कजवळ थांबले होते. यावेळी बडतर्फ पोलीस परवेज तेथे आला आणि त्यांनी दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळातच आरोपी परवेजने दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली असता त्याच वेळी परवेजचा साथीदारही तेथे आला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून हितेश व अभिलाष यांना बेदम मारहाण केली. त्यांनी या तरुणांकडून सोनसाखळी व रोख रक्कम घेऊन पळ काढला. सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.