अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- जिल्हातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मेळघाट येथील विविध शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक आज, सोमवारी (23 सप्टेंबर) सकाळी शाळेच्या वेळेवर हजर होण्यासाठी खाजगी बसमधून प्रवास करीत होते. मात्र धारणी तालुक्यातील सेमाडोह गावाजवळ जलद गतीने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स नाल्यात पलटल्याने भीषण अपघात झाला यात 6 शिक्षकांसह 12 जणांचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथून सकाळी 5.15 वाजता सुटणारी चावला कंपनीची बस अर्धा तास उशिराने पोहोचली. यानंतर पुढे धारणीपर्यंत वेळ कव्हर करण्यासाठी बस चालकाने वेगाने चालवली. यावेळी मेळघाट येथील घाटवळणाच्या रस्त्यांवरून बस वेगाने पुढे नेत असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस सेंमाडोह गावाजवळील नाल्यात पलटली. हा अपघात 8.00 वाजताच्या सुमारास झाला असून या बसमधून 50 हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.
अपघात झाल्यानंतर सेमाडोह येथील रहिवाशांसह व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी अपघातस्थळी मदतीसाठी धावले. त्यांनी नाल्यात कोसळलेल्या अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच या अपघाताची माहिती परतवाडा, चिखलदरा आणि धारणी पोलिसांना देण्यात आली. यानंतर तिन्ही शहरातून बचाव पथक अपघातस्थळी रवाना झाले. या अपघातात आतापर्यंत 6 शिक्षकांसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतकांमध्ये धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले राजेंद्र पाल बाबू यांच्यासुद्धा समावेश आहे. सर्व मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तर 25 हून अधिक जखमी असल्याची माहिती आहे. सर्व जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींवर धारणी तसेच परतवाडा येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी मेळघाट अपघातस्थळी भेट घेऊन अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. मात्र स्थानिकांनी आरोप केला आहे की, मेळघाट परिसरात जीवघेणी प्रवासी वाहतूक होत असते, मात्र वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केलं जातं. या परिसरात अनेक रस्ते आड वळणाचे आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन या मार्गावर अधिक सुरक्षा उपाययोजना प्रशासनाने करावी, योग्य सूचना फलक लावावेत आणि रस्त्याची व्यवस्थित देखभाल करावी, अशी मागणी स्थानिकांनी वेळोवेळी केली आहे. मात्र त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.