हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो.9764268694
चंद्रपूर, दि. 25 : राजुरा येथील रहिवासी असलेल्या आदिवासी समाजातील अभिजीत मधुकर टेकाम, यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी 52 लक्ष 74 हजार 67 रुपयांची (47450 पाऊंड) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अर्थसहाय्याने अभिजित यांना युनिर्व्हरसिटी ऑफ शिफिल्ड (यू.के.) मधून मास्टर ऑफ साइन्स इन बायोडायव्हर्सिटी अॅण्ड कन्झर्व्हेशन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याने या शिष्यवृत्तीची मान्यता देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अभिजित टेकाम यांनी 12 जून 2024 रोजी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव पुढे अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर व त्यानंतर आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आला. 30 ऑगस्ट 2024 रोजी आदिवासी विकास विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत सात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची मंजुरी मिळाली. यामध्ये अभिजीत मधुकर टेकाम यांचाही समावेश आहे. शिष्यवृत्तीची रक्कम 52 लक्ष 74 हजार 67 रुपये अभिजीत टेकाम यांना सरकारकडून अदा केली जाणार आहे. अभिजीत यांना मिळालेली शिष्यवृत्ती ही आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण पाऊल आहे.
अभिजीत यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीबाबत प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी शासनाच्या विविध योजनांचा मोठा हातभार आहे. अभिजीत टेकाम यांना मिळालेली ही शिष्यवृत्ती केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचे प्रतीक नसून आदिवासी समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अभिजीत यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळाली, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. शासनाच्या सहकार्यांने आदिवासी विद्यार्थ्यांना अशीच मदत मिळत राहील आणि ते आपल्या ज्ञानाच्या बळावर देशाचे नाव उंचावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.