पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सध्या राज्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने विविध योजनाचा लाभ हा देण्यात येतो. परंतु सध्या भाजपाच्या आमदार व त्यांच्याच लोकांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्हाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांनीच तसे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. सर्वसामान्य बांधकाम कामगारांच्या त्यांच्या हक्काच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी वेळप्रसंगी कोर्टात सुध्दा जाणार असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सांगीतले.
राज्यातील बांधकाम कामगारांच्या हितासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. यात प्रामुख्याने संसार उपयोगी साहीत्य, घरकुलासाठी मदत, मुलांच्या शिक्षणसाठी मदत यासह जवळपास २८ योजना राबविल्या जातात. राज्यातील लाखो बांधकाम कामगारांनी यासाठी नोंदणी सुध्दा केली आहे. आपल्या हक्काच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी या कामगारांनी विविध योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज सुध्दा केला आहे. यासाठी ते संबधीत कार्यालयात चकरा सुध्दा मारत आहे. परंतु त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपाचे आमदार ज्या विधानसभेत आहेत तेथेच या योजना राबविण्यात येत असून केवळ भाजपाच्या लोकांनाच याचा लाभ देण्यात येत असल्याचा आरोप सलील देशमुख यांनी केला आहे.
आम्ही वारंवार विनंती करुन सर्व बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजनेचा लाभ देण्याची विनंती संबधीत अधिकाऱ्यांना पत्र लिहुन स्वत: भेटुन केली. परंतु नेहमीच त्यांनी टाळाटाळ केली. राज्यासह विदर्भात आणि विशेष करुन नागपूर जिल्हात हजारो बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. परंतु त्या बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. दुसरीकडे भाजपाच्या आमदारांच्या मतदार संघात मात्र मोठया प्रमाणात शिबीरे घेवून काही ठरावीक लोकांना याचा लाभ देण्याचे काम सुरु आहे. हा प्रकार थांबून सर्वच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ अधिकाऱ्यांनी दिला नाही तर यासंदर्भात मोठे आंदोलन करण्यात येईल. यासाठी रस्त्यावरची लढाई सुध्दा लढाण्याची आमची तयारी असून वेळप्रसंगी कोर्टात सुध्दा जाण्याची आमची तयारी असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.
संबधीत अधिकाऱ्यांना निलंबीत कराबांधकाम कामगार त्यांना त्यांच्या हक्काच्या योजनेचा लाभ हा देण्याची जवाबदारी अधिकाऱ्यांची असते. परंतु असे न करता काही ठरावी भागातील व ठरावीक लोकांनाच जर योजनेचा लाभ अधिकारी देत असतील तर ते सुध्दा यात दोषी आहेत. अधिकाऱ्यांनी कुठलाही पक्षपात न करता बांधकाम कामगारांना योजनेच्या लाभ देणे क्रमप्राप्त आहे. परंतु अधिकारीच जर यात पक्षात करत असेल तर अश्या दोषी संबधीत अधिकाऱ्यांवर निलंबाची कारवाई करण्यासाठी सुध्दा मी प्रयत्न करणार असल्याचे सलील देशमुख यांनी यावेळी सांगीतले.