विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- सुरजागड पारंपारीक इलाका गोटूल समितीची इलाका बैठक आज दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीला इलाख्यातील संपूर्ण गावातील भूमिया, गायता, पेरमा व ग्रामसभांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी चर्चा केली कि, जिल्ह्यातील लोह खदानी ज्या भागात सुरू केलेल्या आहेत व आणखी सुरू करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे तो आमचा सुरजागड इलाका परिसर आहे. या इलाक्याने इतर इलाके आणि ग्रामसभांच्या मदतीने खदान विरोधी आंदोलन जिल्ह्यात उभे करुन अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याचे काम आजही अव्याहतपणे सुरु ठेवलेले आहे. तसेच खदान विरोधी मुद्यावर यापूर्वीही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवून ती एकजूटीने निवडूनही आणली आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या वतीने अहेरी विधानसभा लढविण्याचा पहिला मान आणि संधी सुरजागड इलाख्याला मिळाला पाहिजे ही येथील संघर्षशील जनतेची इच्छा आणि मागणी आहे.
तसेच सदर निवडणूक ही खदान समर्थक आत्राम घराण्याच्या आणि भाजप युती – काॅग्रेस महाविकास आघाडीच्या विरोधात लढवायची असल्याने ग्रामसभांचा उमेदवार सुध्दा पाचही तालुक्यात परिचित आणि लोकांच्या मनात जागा निर्माण करणारे असावे, याची काळजी घेणे गरजेचे असल्याने ग्रामसभांच्या एकुण नावांपैकी सुरजागड इलाख्याचे एकमेव नामांकन असलेले श्री. सैनू मासू गोटा यांनाच उमेदवार म्हणून सर्वांनी त्यांची निवड करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.
श्री. सैनू मासू गोटा यांना माडिया, तेलगू, हिंदी, मराठी या भाषा अवगत असून त्यांनी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक, पंचायत समीती सभापती, जिल्हा परिषद सदस्य अशी विविध पदे भूषविलेली असून २०१२ पासून त्यांनी पक्षीय राजकारण सोडून ग्रामसभांसाठी पुर्णवेळ काम केले आहे. त्यापोटी अनेक पोलीस केसेस आणि जनतेसाठी त्रास सहन केलेला आहे. करीता सुरजागड पारंपारीक इलाका गोटूल समिती आणि पर्यायाने श्री. सैनू मासू गोटा यांनाच अहेरी विधानसभेचा उमेदवार म्हणून संधी मिळावी, असा ठराव सर्वानुमते ठेवण्यात आला होता. तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.