मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली ब्युरो.
अहेरी तालुक्यातील चंद्रा येथील शेतक-यांच्या शेतात अवैधरित्या उत्खनन केलेल्या रेतीची मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्या प्रकरणी अहेरी तहसिलदारांनी संबंधित कंत्राटदारास तब्बल 84 लाख 34 हजार 600 रुपयाचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी तक्रार दाखल करीत प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा संबंधितावर कारवाईची मागणी लावून धरली होती. तहसिलदारांच्या या दंडात्मक कारवाईमुळे त्यांच्या प्रयत्नाना यश आले.
सविस्तर वृत्त असे की, अहेरी तालुक्यातील चंद्रा गावालगत एका खाजगी कंत्राटदाराने प्लांटवर रेतीची साठवणूक केली असल्याचे निदर्शनास येताच सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यासंदर्भात 7 सप्टेंबर 2022 रोजी अहेरी तहसिल कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने चौकशी केली असता 466.43 ब्रास रेतीसाठा अवैध असल्याचे आढळून आले. सदर रेतीसाठा मे. जि. एस.डी. इंडस्ट्रिज नागपूरचे गजानन मेंढे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. तसेच सदरची रेती भामरागड तालुक्यातील लिलावातील येचली नदी घाटातून उत्खनन न करता इतरत्र ठिकाणावरून रेती आणून वाहतूक केल्याचे सिद्ध झाले होते. पेरमिली मंडळ अधिका-यांच्या चौकशीअंती साठवणूकीतील रेतीचे परवाने येचली येथील असल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणातही प्रशासन, शासनाची शुद्ध फसवणूक झाल्याची सिद्ध झाले. याअंती अहेरीचे तहसिलदार यांनी 466 ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्या प्रकरणी संबंधितावर 84 लाख 34 हजार 600 रुपयाची दंडात्मक कारवाई सुनावली आहे. येत्या सात दिवसात दंडात्मक रक्कम जमा करण्याचे निर्देशही तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी दिले आहे.