राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मंगळवारी केद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
त्यात, राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर करण्याच्या टायमिंगवर शिवसेना ठाकरे गटानं शंका उपस्थित केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुका जाहीर झाल्या, त्यामागे षडयंत्र तर नाही ना? अशी शंका ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, ऐन निवडणुकीला तोंड फुटण्यापूर्वीच उद्धव ठाकरे आजारी पडणं हे आमच्या दृष्टीने दु:ख दायक आहे. उद्धव ठाकरे आजारी पडल्या बरोब्बर महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागते, ही बाब आश्चर्यकारक आहे. उद्धव ठाकरे हे आजारी असताना निवडणूक लागावी, एका टप्प्यात निवडणूक ठरवावी, आचार संहितेसाठी 45 दिवससुद्धा दिले न जावेत, याच्या पाठीमागे षडयंत्र तर नाही ना? याबाबत महाराष्ट्रातील जनतेला शंका आलेली आहे, असं विधान भास्कर जाधव यांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना नियमित तपासणीसाठी नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजिऑप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र आदित्य ठाकरे यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांना पूर्व नियोजित आणि नियमित तपासण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली होती.