गुणवंत कांबळे. मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सायन कोळीवाड्यातील सुप्रसिध्द तक्षशिला बु़्ध्द विहार येथे दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी दिप संदेश मंडळ, देवळे (रजि.), मुंबई आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अशोका विजयादशमी आणि ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव कौटुंबिक स्नेह मेळावासह बहुसंख्येच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात दोन सत्रात पार पडला.
सदर महोत्सवाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष आयु. दिनेश शशिकांत साळवी यांनी भूषविले तर सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य आयु. संदीप विठ्ठल कांबळे यांनी योग्य रित्या पार पाडले तर स्वागत समारंभ मंडळाचे सचिव आयु. दिलीप शंकर कांबळे यांनी केले. सकाळी ठिक १०.०० वाजता पहिल्या सत्राची सुरुवात करताना बौध्दाचार्य अरुण कांबळे (भोवडेकर) गुरुजी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलित करून बुद्ध वंदनेने सुरुवात केली. ह्यावेळी मार्गदर्शन करताना बौध्दाचार्य किरण जाधव गुरुजी यांनी भगवान बुद्धांनी आपल्याला दिलेला महान धम्म म्हणजे बुद्ध धम्म या धम्माविषयी मोलाचे मार्गदर्शन करून धम्माचा प्रचार आणि प्रसार कशाप्रकारे करायला पाहिजे ?असे सांगून सदर कार्यक्रम दीप संदेश मंडळ यांनी प्रथमच मुंबई या ठिकाणी सुरू केला आहे. त्याबद्दल मंडळाचे मन:पूर्वक आभार मानले.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाला लाभलेले दुसरे मार्गदर्शक अण्णा कडलासकर यांनी अंधश्रद्धा आणि त्याचे परिणाम याचे वास्तववादी चित्र उभे करून त्याचे प्रात्यक्षित दाखवून उपस्थित जणांना मंत्रमुग्ध करून खिळवून ठेवले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अर्थात कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश शशिकांत साळवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंनी स्थापन केलेल्या दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अंतर्गत भारतीय बौध्द महासभा ची दहा प्रमुख उद्दीष्टे मांडत तरुणांनी एकत्र येऊन बहुजनांमध्ये महापुरुषांच्या विचारांची सांगड घालून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार केला पाहिजे, करोडोची बुध्द विहारे बांधून नुसती चालत नाही तर ते बुध्द विहार संस्कार केंद्र म्हणून स्थापित होणे आवश्यक असून सर्वत्र धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. ह्याकरीता युवा वर्गातून अधिक प्रमाणात शिक्षित नवीन कार्यकर्ते निर्माण करता आले पाहिजे आणि हे कार्य तुम्ही आम्ही करायचे आहे, असे सांगताना कार्यक्रमाला लाभलेल्या मार्गदर्शकांचे सन्मानपूर्वक आभार मानले.
तसेच, सदर कार्यक्रमाला सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने सहभाग घेऊन सहकार्य केल्याबद्दल आणि सहपरिवार बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आभार मानले.आभार प्रदर्शनांनंतर पहिले सत्र संपवित असताना भगवान बुध्दांच्या महानिर्वाणानंतर जगाला भारत देशाच्या सुवर्ण पर्वाची आठवण करून देण्यासाठी, त्यांच्या धम्माची ऐतिहासिक ओळख स्थापित करण्यासाठी, बौध्द धम्म जनमाणसात पोहचवण्यासाठी ८४ हजार चैत्य, बुध्द लेणी, बुध्द स्तुप, सांची स्तुप बांधून शिलालेखात इतिहास अजरामर करणारे कार्य प्रिर्यदर्शी सम्राट अशोक यांच्या जीवनकार्यपटावर आधारित “देवानंपिय असोकं” हे रंगभूमीवर प्रदर्शित होणाऱ्या नाटकाचे पोस्टर अनावरण व्दारे प्रमोशन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी उभे राहून सम्राट अशोकांना मानवंदना देऊन उद्घोषणा करून जयजयकार केला. बौध्दाचार्य जितेंद्र स. कांबळे (माजलकर) ह्यांनी नाटकाची पाश्वभूमी मांडून सर्वांना नाटक पाहण्याचे आवाहन केले.
स्नेह भोजनानंतर दुपारी ३.०० वाजता कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला दहावी – बारावी व पदवीधर तसेच कला क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावून यशस्वी झाल्याबद्दल अशा विद्यार्थी व विद्यार्थिनींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यानंतर महिला मंडळाचा महिला मेळावा कार्यक्रम एकमेकांची ओळख करून व उखाणे घेऊन जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सहस्ते धम्मदान करणाऱ्यांचाही सन्मानपुर्वक सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम बहुसंख्येच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला व कार्यक्रमाची सामुदायिक सरणंत्तय् घेऊन झाली.