श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परभणी:- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “नेक्स्ट-जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना” या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्सची ५८ वे वार्षिक अधिवेशन आणि “कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण” या विषयावर १२ ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असुन सदर परिसंवादात कृषी अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण उपाय आणि प्रगती यावर चर्चा करण्यासाठी देश-विदेशातील ५०० पेक्षा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अधिकारी व शास्त्रज्ञ, देशातील विविध राज्यातील कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना उद्योगांचे प्रतिष्ठित प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि शास्त्रज्ञ, उद्योजक, विविध विभागातील मान्यवर, संशोधक विद्यार्थी, कृषि अभियंता सहभागी होणार आहे. अमेरिका, जर्मनी, जपान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया इत्यादी देशातुन ७०० पेक्षा जास्त संशोधन सारांश प्राप्त झाले आहेत.
उदघाटन प्रसंगी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ आर एस परोडा, महासंचालक डॉ हिमांशु पाठक, आयआयडी कानपुर चे संचालक पद्मश्री डॉ. मनींद्र अग्रवाल, आयआयटी खरगपुरचे संचालक डॉ. व्ही. के. तिवारी, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अभियंता संघटनेचे अध्यक्ष तथा उप महासंचालक कृषि अभियांत्रिकी डॉ. एस एन झा, अमेरिका येथे वास्तव्यास असलेले भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उप महासंचालक डॉ. गजेंद्र सिंह, कृषि परिषदेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे, पीडीकेव्ही अकोलाचे कुलगुरू डॉ शरद गडाख, एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू डॉ प्रशांतकुमार पाटील, बीएसकेकेव्हीचे कुलगुरू डॉ संजय भावे, उदयपुर माजी कुलगुरू डॉ. एन. एस. राठोड, अमेरिकेतील परडु विद्यापीठाचे डॉ. किंग्स्ले, नेपाळ येथील डॉ. भिमप्रसाद श्रेष्ठा, आसीयन असोसिएशनचे डॉ.सय्यद इस्माइल, विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी कृषि व कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबाबत पद्मभुषण डॉ आर एस परोडा यांना आयएसएई मानद फेलाशीप २०२४ ने गौरविण्यात येणार आहे.
दिनांक १२ नोव्हेबर रोजी “कृषी परिवर्तनासाठी इच्छुक तरुणांकरिता कृषी अभियांत्रिकी शिक्षण” या विषयावर आयआयटी खरगपूर चे संचालक डॉ. व्ही. के. तिवारी, माजी कुलगुरू (उदयपुर) डॉ. एन. एस. राठोड, अमेरिकेतील परडू विद्यापीठाचे डॉ. किंग्स्ले, नेपाळ येथील शास्त्रज्ञ डॉ. भिमप्रसाद श्रेष्ठा, आसीअन असोसिएशानचे डॉ. सय्यद इस्माइल तसेच देश विदेशातील तज्ञ शास्त्रज्ञ विचार व्यक्त करणार असून दिनांक १४ नोव्हेबर रोजी “नेक्स्ट-जेन डिजिटल ॲग्रिकल्चर अभियांत्रिकी नवकल्पना” या विषयावर आयआयडी खरगपूर येथील डॉ. मदन झा, लुधियाना येथील अधिष्ठाता डॉ. मनजित सिंग मार्गदर्शन करणार आहे. दिनांक १३ नोंव्हेबर रोजी चार विषयांतर्गत समांतर पाच मौखीक व पाच पोस्टर सत्र याप्रमाणे एकूण २० मौखीक व २० पोस्टर सत्राचे नियोजन करण्यात आले आहे.
चार चर्चासत्रात पुढील विषयावर विचार मंथन.
पहिल्या सत्रात कृषी यांत्रिकीकरण आणि स्वयंचलन यात बियाणे ते बियाणे यांत्रिकीकरण, मशागत आणि ट्रॅक्शन यांत्रिकीकरण, लागवड, पुनर्लावणी, वनस्पती संरक्षण, कापणी आणि मळणी यंत्रे, मेकॅट्रॉनिक्स, ड्रोन, अल आणि रोबोटिक्ससह सौर उर्जेवर चालणारी उपकरणे, एर्गोनॉमिक्स आणि मानवी सुरक्षा आदी विषयावर चर्चा होणार आहे.
दुस-या सत्रात अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान सत्रामध्ये काढणीनंतरचे अभियांत्रिकी आणि कृषी आणि फळ भाजीपाल पिकांची हाताळणी, अन्न प्रक्रिया आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, पोषक व मूल्यवर्धित पदार्थ आदी विषयावर.
तिस-या सत्रात जमीन आणि जल व्यवस्थापन तंत्रज्ञान / मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी यात माती आणि जल अभियांत्रिकी आणि ड्रेनेज सिस्टम्समधील भौगोलिक तंत्रज्ञान, भूजल वापर आणि इष्टतम वाढ, संवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाद्वारे आधुनिक शेतीसाठी पाणी संवर्धन शेती, आधुनिक सिंचन व्यवस्थापन आणि शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी नवकल्पना, कृत्रिम बुध्दीमत्ता, आयओटी, मशिन लर्गिन, यावर चर्चा होणार आहे.
चौथ्या सत्रात हरित आणि पर्यायी ऊर्जा तंत्रज्ञान वरील कृषी-पीव्ही आणि सौर उर्जा तंत्रज्ञान, कृषी आणि उद्योगांमध्ये अक्षय ऊर्जा अनुप्रयोग बायोमास ऊर्जा, जैवइंधन उत्पादन तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, कचरा / ऊर्जा संवर्धनातून ऊर्जा निर्मिती, पशु ऊर्जा यावर चर्चा होणार आहे.
कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक प्रणाली यावर देशातील नामवंत शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याबरोबरच शेतकरी बांधवाकरिता स्वतंत्र चर्चा राहणार असुन आधुनिक तंत्रज्ञानाचे विविध दालने लावण्यात येणार असून विद्यार्थी व शेतकरी ह्यांना उपयुक्त ठरणार आहे. शाश्वत शेतीसाठी पुढील नियोजन आणि अंमलबजावणीसाठी अधिवेशनाची शिफारस राज्य आणि केंद्र सरकारला सादर केली जाणार आहे. परिसंवादात कृषी प्रदर्शन, विविध विषयावर आधारित सत्रांचे आयोजन करण्यात आले असुन आणि शेतकरी – शास्त्रज्ञ – विद्यार्थ्यां संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी धोरणांसाठी अधिवेशनातील शिफारशी सरकारला सादर केल्या जातील. सदर परिसंवादासाठी विविध खते, बियाणे, ड्रोन, ट्रक्टर, मशिनरी, ठिबक, तुषार, अन्न प्रक्रिया, सौर, उत्पादन कंपनी तसेच शासकीय, निमशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था यांचा सहभाग राहणार आहे.
आधुनिक यांत्रिकीकरणावर उद्योग आधारित स्वतंत्र चर्चा राहणार असुन याबरोबरच कृषि क्षेत्रातील नामवंत उद्योगसमुहाचे उच्चपदस्थ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहून आधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत. यात विशेषकरून महिंद्रा आणि महिंद्रा समूहाच्या शेती साहित्य विभागाचे अध्यक्ष डॉ. हेमंत सिक्का, अस्पीचे श्री जतीन पटेल, टफेचे समूहाचे श्री केशवन, नेटाफिम इरिगेशनचे श्री रणधीर चव्हाण, रेव्ह्यूलीस इरिगेशनचे श्रीमती संगीता लड्डा, महिको समूहाचे श्री राजेंद्र बारवाले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या अनुषंगाने विद्यापीठाचे माननीय कुलगुरु प्रा.(डॉ) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस संचालक शिक्षण तथा आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक डॉ उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, सहाय्यक नियंत्रक वैशाली ताटपल्लेवार, संयोजन सचिव डॉ हरीश आवारी, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, सह संयोजक डॉ. आर. टी रामटेके, संयोजन सह सचिव डॉ. एम. एस. पेंडके, डॉ. व्ही. के. इंगळे, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व दैनिके आणि साप्ताहिकांचे सन्मानीय संपादक/जिल्हा वार्ताहार आदींची उपस्थिती होती.
इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअर्स (ISAE) ची थोडक्यात माहिती
इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअर्स (ISAE) ची स्थापना 1960 मध्ये देशातील कृषी अभियंत्यांना एकाच व्यासपीठावर एकत्र करून व्यवसाय मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. सोसायटीने कृषी क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील सुव्यवस्थित दुवे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उप महासंचालक (कृषि अभियांत्रिकी) डॉ. शामनारायण झा हे असून सचिव भारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे डॉ. प्रमोद साहू आणि उपाध्यक्ष देहाराडून येथील डॉ. अंबरीश कुमार आणि मुंबई येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे डॉ. डी. एन. कदम हे आहेत.
या सोसायटीच्या परभणी शाखेची स्थापना २००१ मध्ये झालेली असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे आधारस्तंभ आहेत तर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके हे अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ उदय खोडके, संयोजन सचिव डॉ हरीश आवारी, सह संयोजक डॉ. आर. टी रामटेके आणि डॉ. आर जी. भाग्यवंत, संयोजन सह सचिव डॉ. एम. एस. पेंडके, डॉ. व्ही. के. इंगळे आणि डॉ. डी.डी. टेकाळे हे आहेत.