मयुरी टेंभरे, नागपूर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- स्नेहांगन दिव्यांग मुंलाची शाळा, मातृ सेवा संघ नागपुर शाळेमध्ये पालक सभा व दिवाळी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्रीमती सुजाता सन्याल मॅडम, श्रीमती वीणा मोहाडीकर मॅडम, श्रीमती कल्पना यादव फिजिओथेरपिस्ट सी.आर.सी नागपूर, श्रीमती स्मिता तलमले उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ, शाळा प्रमुख श्रीमती मृणाली देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग अपंग विद्यार्थ्यांच्या जीवनात आपण दिव्यांग असल्याची उणीव न व्हावी आणि या दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व श्लोक सादर करून करण्यात आली. यावेळी सुमधुर स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी दिल्ली पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक श्री तुपकर सर यांनी ‘दान उत्सव’ या उपक्रमा अंतर्गत स्नेहांगन दिव्यांग मुंलाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊंचे वितरण केले. यावेळी दिव्यांग मॉडेलिंग शोचे आयोजक सुरज कडू व त्यांच्या सहकाऱ्याच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने मिठाईचे वितरण करण्यात आले. श्रीमती कल्पना यादव फिजिओथेरपीस्ट सीआरसी नागपूर यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनां बद्दलची माहिती दिली, तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले व योजनांचे पत्रके वितरित केले. शाळेच्या मनसेवी शिक्षिका श्रीमती सन्याल मॅडम आणि श्रीमती मोहाडीकर मॅडम व श्रीमती स्मिता तलमले यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या बाल जगत स्पर्धा, स्वातंत्र्याचा स्वराभिषेक स्पर्धा, दिव्यांग कला महोत्सव २०२४ मध्ये विशेष पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच पालकांच्या हस्ते प्रमाणपत्र व शिल्ड वितरित करण्यात आले. आपल्या आई- बाबांच्या हस्ते पारितोषिक व मानचिन्ह घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
नोव्हेंबर २०२४ मधे होणाऱ्या विधानसभा निवडणुकी बाबत दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून, दिव्यांगांना मतदान सुगमतेने करता यावे, याकरिता शासनाने विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन मा. शाळा प्रमुख श्रीमती मृणाल मॅडम यांनी केले. यावेळी दिव्यांग मतदान जनजागृतीच्या निमित्ताने शाळेत सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र व रंगविलेल्या पणत्यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती शिल्पा कोमलकर मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती सोनाली वाढीवे मॅडम यांनी केले. दिवाळी सेलिब्रेशनच्या निमित्ताने शाळा परिसराची आकाश कंदील, सुरेख रांगोळी, तोरण व दिव्यांच्या रोषणाईने सजावट करण्यात आली. विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीमती मोहाडीकर मॅडम यांच्या तर्फे दिवाळीचा फराळ वितरित करण्यात आला. फराळ घेऊन सर्व विद्यार्थी आनंदाने घरी गेले.