मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चामोर्शी तालुक्यातील येनापूर गावाजवळ येथे एका इसमाला कोंबडा दिला नाही म्हणून हत्या करून मृतदेह जाळून टाकण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. ही घटना बुधवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास समोर आली आहे. मनोज आनंदराव मेकर्तीवार वय 32 वर्ष रा.सोमनपल्ली, ता.चामोर्शी असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन राजेश्वर मेकर्तीवार राह. सोमनपल्ली व राहुल गुंजेकर राह. चिंचाळा, जिल्हा चंद्रपूर यांना बेड्या ठोकल्या आहे.
बुधवारला आरोपी सचिन मेकर्तीवार व राहुल गुंजेकर हे हत्या करण्यात आलेल्या मनोज मेकर्तीवार याच्या घरी गेले. आरोपींनी मृतक मनोजला कोंबडा देण्याची मागणी केली. व कोंबडा न दिल्यास जीवाने मारुन टाकू, असे धमकावले. यामुळे मनोज घरामागील आवारात जाऊन लपला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मनोजला याच्या घरी नेऊन लोकांसमोर जबर मारहाण केली आणि मोटार सायकलवर बसवून त्याला येनापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने घेऊन गेले. पुढे जंगलातील नाल्यात मनोजची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळून टाकला.
सोमनपल्ली येथील संगीता येलगलवार यांच्या फियार्दीवरुन आष्टी पोलिसांनी सचिन मेकर्तीवार व राहुल गुंजेकर यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1), 238, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विशाल काळे व उपनिरीक्षक मानकर घटनेचा तपास करत आहे.